प्रो कबड्डीसुद्धा शक्य आहे, पण  `या` गोष्टी कराव्या लागतील

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 22 जून 2020

कबड्डी हा कमालीचा शारीरिक संपर्क असलेला खेळ असल्याने त्याचे पुनरागमन अवघडच आहे, असे मानले जात आहे; मात्र काही कबड्डी मार्गदर्शक अनौपचारिक चर्चेत प्रो कबड्डी लीगचे संयोजन अवघड असले, तरी अशक्‍य नाही, अशी टिप्पणी करतात. 

 

मुंबई ः भारतातील सर्वात लोकप्रिय असलेली आयपीएल सुरू करण्याबाबत भारतीय क्रिकेट मंडळाने सुरुवात केली आहे, मात्र देशात क्रिकेटखालोखाल लोकप्रिय असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या संयोजनाची अद्याप कोणतीही पूर्वतयारी सुरू झालेली नाही. कबड्डी हा कमालीचा शारीरिक संपर्क असलेला खेळ असल्याने त्याचे पुनरागमन अवघडच आहे, असे मानले जात आहे; मात्र काही कबड्डी मार्गदर्शक अनौपचारिक चर्चेत प्रो कबड्डी लीगचे संयोजन अवघड असले, तरी अशक्‍य नाही, अशी टिप्पणी करतात. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेसाठी वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानचा संघ तीन आठवडे अगोदर इंग्लंडला दाखल होऊ शकतो. हे संघ पूर्णपणे विलगीकरणात राहून सराव करू शकतात. जैवसुरक्षित वातावरणात मालिका होऊ शकते. पारंपरिक कबड्डी स्पर्धांसाठी हे अवघड आह; पण प्रो कबड्डी स्पर्धेबाबत सहज शक्‍य होऊ शकते, याकडे एका मार्गदर्शकांनी लक्ष वेधले. अन्य एका मार्गदर्शकांनी यास दुजोरा दिला. त्याच वेळी ही लीग झाल्यास देशातील कबड्डी खेळाडू तसेच मार्गदर्शकात उत्साह येऊ शकेल, असेही ते म्हणाले. 

क्रीडा विश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रो कबड्डी लीग सुरू होण्यापूर्वीपासून संघांचे शिबिर सुरू असते, तसेच लीग सुरू असताना संघातील खेळाडू क्वचितच ब्रेक घेऊन जातात. आता हेच फक्त जास्त काळजीपूर्व केल्यास ही लीग शक्‍य आहे, असे मार्गदर्शकांचे मत आहे. जैवसुरक्षित वातावरणात लीग शक्‍य आहे. प्रेक्षकांविनाच अपेक्षित असलेली ही लीग कोरोनाची साथ आटोक्‍यात असलेल्या राज्यात घेता येईल. लीग होणार असलेल्या शहरात खेळाडूंना पूर्वचाचणी करून एकत्रित आणता येईल. लीगपूर्वी एक महिना त्यांची प्रतिकार शक्ती वाढवण्याकडे लक्ष देण्याकडे लक्ष द्यावे लागेल, असे मार्गदर्शकांचे मत आहे. 

काय..! तेव्हा सचिन नाॅट आऊट होता; एवढ्या वर्षांनंतर पंचांना उपरती

कबड्डी अभ्यासकांनी त्यास दुजोरा दिला. लीग पूर्ण सुरक्षित करण्यासाठी खेळाडूंचा मुक्काम असलेल्या ठिकाणी तसेच त्यांच्या भोजनाच्या ठिकाणचा प्रवेश पूर्ण मर्यादित ठेवता येईल. खेळाडूच नव्हे, तर मार्गदर्शक, स्पर्धा कर्मचारी, पंच, सामनाधिकारी कोणाच्याही संपर्कात येणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. कोरोना कोणालाही होणार नाही, याची कठोरपणे काळजी घ्यावी लागेल, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी स्पर्धा होणारे मैदान तसेच मुक्कामाची जागा रोज निर्जंतुक करावी लागेल. त्यामुळेच ही लीग अवघड असली, तरी अशक्‍य नाही, असे त्यांचे मत आहे. 

 

कबड्डीपटूंत चांगली प्रतिकारशक्ती असते. भारतात अनेक कबड्डीपटू पोलिस आहेत. त्यातील किती जणांना कोरोनाची लागण झाली आहे, ते बघा, म्हणजे त्यांच्यात किती उच्च प्रतिकारशक्ती आहे, हे लक्षात येईल. 
- कबड्डी अभ्यासक 

आपल्या घरात आपण मुक्तपणे वावरतो. घरात असताना मास्क वापरत नाही किंवा सुरक्षित अंतरही ठेवत नाही. घरातील प्रत्येक सदस्य सुरक्षित असल्याची आपल्याला खात्री असते. हेच लीगबाबतही करता येईल. 
- कबड्डी मार्गदर्शक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pro Kabaddi is also possible, but `these` things have to be done