प्रो-रेसलिंगसाठी कुस्तीपटू गीता फोगट सज्ज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - ‘दंगल’ या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेली महिला कुस्तीपटू गीता फोगट नव्याने ‘प्रो-रेसलिंग’च्या पर्वास सज्ज झाली आहे. दुखापतीमुळे स्पर्धात्मक पातळीपासून दूर राहिलेली गीता या लीगच्या निमित्ताने पुन्हा एकदा मॅटवर उतरणार आहे. 

नवी दिल्ली - ‘दंगल’ या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेली महिला कुस्तीपटू गीता फोगट नव्याने ‘प्रो-रेसलिंग’च्या पर्वास सज्ज झाली आहे. दुखापतीमुळे स्पर्धात्मक पातळीपासून दूर राहिलेली गीता या लीगच्या निमित्ताने पुन्हा एकदा मॅटवर उतरणार आहे. 

महिला कुस्तीगीर म्हणून नावलौकिक असणाऱ्या गीताला पायाच्या दुखापतीमुळे प्रदीर्घ काळ कुस्तीपासून दूर राहावे लागले. या दरम्यान गीता आणि बबिता या बहिणींच्या कारकिर्दीवर आलेल्या ‘दंगल’ चित्रपटाने पुन्हा एकदा त्यांचे नाव चर्चेत आले. त्याहीपेक्षा ‘प्रो-रेसलिंग’च्या नव्या पर्वात या दोघींसह त्यांची चुलत बहीण विनेश फोगटदेखील आपले कौशल्य दाखवण्यास सज्ज झाली आहे. उत्तर प्रदेश संघाकडून खेळणारी गीता म्हणाली, ‘‘आम्ही लहानपणापासूनच कठोर मेहनत घेत आलो आहोत. त्यामुळे नव्याने सुरवात करण्याची मुळीच गरज नाही. दुखापती या खेळाडूच्या कारकिर्दीचा एक भागच असतात. यापूर्वीही अनेकदा मला आखाड्याबाहेर राहावे लागले आहे. पण, आता मला मेहनतीचे फळ मिळू लागले आहे.’’

स्पर्धात्मक पातळीवर पुनरागमन करताना दडपण जरूर आहे. पण, यशस्वी होण्याचा विश्‍वासही असल्याचे तिने सांगितले. त्याच वेळी आपल्याला अव्वल कुस्तीगीर म्हणून ‘दंगल’ चित्रपटानंतर मान्यता मिळाल्याची खंत तिने बोलून दाखवली. ती म्हणाली, ‘‘जागतिक स्पर्धेत २०१२मध्ये ब्राँझ आणि त्यापूर्वी २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यानंतरही आम्हाला लोकप्रियता मिळण्यासाठी आमच्यावर प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’ चित्रपटाची वाट पाहावी लागली. आम्हाला आमच्या कुस्तीच्या कौशल्याने नव्हे, तर चित्रपटामुळे मान्यता मिळाल्याची खंत मनात कायम राहील.’’
गीतासमोर या वेळी ऑलिंपिक ब्राँझपदक विजेत्या साक्षी मलिकचे आव्हान असेल. ती दिल्लीकडून खेळणार आहे. गीता म्हणाली, ‘‘साक्षी असो वा रिओ ऑलिंपिकमधील ब्राँझपदक विजेती ट्युनिशियाची मारवा अमरी. मी कुणाचेही आव्हान पेलण्यास समर्थ आहे. माझ्याकडे कौशल्य आणि तंत्र आहे. सराव चांगला झाला आहे. तंत्राचा अवलंब कसा करते यावर बरेच काही अवलंबून असेल. तंत्र सुधारण्यावर मी सध्या काम करत आहे.’’

गीताच्या बरोबरीने बबितादेखील उत्तर प्रदेश संघातूनच खेळत आहे. ती म्हणाली, ‘‘नवे तंत्र शिकण्यावर भर देत आहे. परदेशी सहकाऱ्यांबरोबर खेळण्याचा आम्हाला फायदाच होईल. यंदाच्या लीगमध्ये आमचा संघ ताकदवान दिसत आहे. परदेशी आणि राष्ट्रीय खेळाडूंचा चांगला समन्वय साधला गेला आहे.’’

गीता, बबितासह उत्तर प्रदेश संघात अमित धनकर, अमित दहिया आणि मौसम खत्री या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

Web Title: pro-wrestling geeta fogat ready