
PSL 2023 : अंतिम सामना असावा तर असा... शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज अन्... लाहोर कलंदर्स चॅम्पियन!
Multan Sultans vs Lahore Qalandars Final : पाकिस्तान सुपर लीगच्या आठव्या हंगामाच्या अंतिम सामन्यात उत्साहाने सर्व मर्यादा ओलांडल्या. विजेतेपदाच्या सामन्यात मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील मुलतान सुल्तान्सचा संघ शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील लाहोर कलंदर संघासमोर होता.
आफ्रिदीच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर लाहोर कलंदर्सने अंतिम फेरीत मुलतान सुलतान्सचा 1 धावेने पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा या ट्रॉफीवर कब्जा केला. गतवर्षीही या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला होता ज्यात लाहोर कलंदरने विजय मिळवला होता.
शनिवारी रात्री लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात मुलतान सुलतान संघाला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज होती, मात्र शाह अब्बास आफ्रिदीला जमान खानच्या चेंडूवर केवळ 2 धावा काढता आल्या. शाहीन आफ्रिदीने खुशदिलला धावबाद केल्यावर दोघेही तिसर्या धावण्याच्या शोधात होते. अशा प्रकारे लाहोर कलंदरचा संघ 1 धावांनी विजयी झाला.
प्रथम फलंदाजी करताना लाहोर कलंदरने 20 षटकांत 6 गडी गमावून 200 धावा केल्या. शफीकने 65 धावांची खेळी खेळली, तर 15व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर क्रीझवर उतरलेल्या कर्णधार शाहीन आफ्रिदीने 15 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 44 धावा केल्या. शाहीन जेव्हा क्रिजवर उतरला तेव्हा कलंदर संघाने 112 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या. सलामीवीर फखर जमान 39 आणि मिर्झा बेग 30 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. मुलतान सुलतानकडून उस्मान मीरने 3 विकेट घेतल्या.
201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुलतान सुलतान्सचा संघ रिजी रुसोच्या अर्धशतकानंतरही 8 गडी गमावून 199 धावाच करू शकला. शेवटच्या षटकात मुलतान सुलतान्सला विजयासाठी 13 धावांची गरज होती. संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या जमान खानकडे रिझवानने चेंडू सोपवला.
जमानने सामन्याच्या शेवटच्या षटकातील पहिल्या 5 चेंडूत 9 धावा दिल्या. यानंतर मुलतानला शेवटच्या चेंडूवर चौकारांची गरज होती, जो खुशदिलला मारता आला नाही. लाहोर कलंदरकडून शाहीन आफ्रिदीने चार विकेट घेतल्या.