आशियाई बॅडमिंटन : चीनच्या बिंगजियाओची सिंधूवर मात

वृत्तसंस्था
शनिवार, 29 एप्रिल 2017

पुरुष एकेरीचे निकाल (उपांत्यपूर्व) :

लीन डॅन (चीन 4) विवि चोयू तिएन चेन (तैवान 7) 21-14, 21-12 
ली चोंग वेई (मलेशिया 1) विवि. ह्‌सू जेन हाओ (तैवान) 21-18, 21-13. शी युक्वी (चीन 6) विवि सॉन वॅन हो (कोरिया 3) 21-16, 21-15. 
चेन लॉंग (चीन 2) विवि एन्जी का लॉंग अँगस (हॉंगकॉंग 8) 21-17, 21-13

वुहान (चीन) : भारताच्या पी. व्ही. सिंधूला आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. चीनच्या ही बिंगजियाओ हिच्याकडून ती 21-15, 14-21, 22-24 अशी हरली.

याबरोबरच भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सिंधूने आगेकूच करताना आधीच्या सामन्यांत भक्कम खेळ केला होता. त्यामुळे तिच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. तिने दोन मॅचपॉइंट वाचविले; पण बिंगजियाओने बाजी मारली. कारकिर्दीत आठ लढतींत तिने पाचव्यांदा सिंधूला हरविले. हा सामना एक तास 17 मिनिटे चालला. 

अखेरचा गेम रंगतदार ठरला. बिंगजियाओने 6-1 अशी आघाडी घेतली. ती तिने 12-7 अशी वाढविली. सिंधूने 15-15 अशी बरोबरी साधली होती; पण बिंगडियाओने प्रत्येक गुणासाठी जोरदार संघर्ष केला. दुसरीकडे सिंधूने हार मानली नाही. बिंगजियाओने 20-18 अशी आघाडी घेतल्यानंतरही सिंधूने निकराची झुंज दिली; पण तिला हार मानावी लागली. 

बिंगजियाओसमोर जपानच्या अकाने यामागुची हिचे आव्हान असेल. द्वितीय मानांकित अकाने हिने सहाव्या मानांकित थायलंडच्या रत्नाचोक इंतानोन हिला 21-16, 21-19 असे हरविले. दुसरा उपांत्य सामना अग्रमानांकित तैवानची ताई त्झू यिंग आणि बिगरमानांकित कोरियाच्या जॅंग मी ली यांच्यात होईल. ताईने बिगरमानांकित चीनच्या चेन युफेई हिला 21-11, 21-7 असे हरविले. जॅंगने थायलंडच्या नित्चाओन जिंदापोल हिचे आव्हान 21-19, 21-9 असे मोडून काढले. 

Web Title: PV Sindhu lost in quarter finals of Asian Badminton