आता नवे प्रयोग करावे लागतील - सिंधू

प्रतिनिधी
रविवार, 15 सप्टेंबर 2019

जागतिक अजिंक्यपद आणि पुढील आव्हाने याबाबत काय म्हणतेय सिंधू......

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताला पहिले वहिले सुवर्णपदक मिळवून देणारी पी. व्ही. सिंधू विजेतेपदामध्ये न रमता आता पुढची तयारी सुरु केली आहे. केवळ आपला खेळच नव्हे तर प्रतिस्पर्धी कोणता विचार करत असतील आणि त्यावर मात करून आपल्याला कसे एक पाऊल पुढे रहाता येईल हा विचार म्हणजे प्रगती कायम असल्याचे दर्शवते. सिंधूची हीच खासियत आहे. जागतिक स्पर्धेत अजिंक्यपद मिळवताना सिंधूने केलेल्या खेळाचा इतर सर्वांना बारकाईने अभ्यास केला असेल. आणि पुढच्या स्पर्धांमध्ये सिंधूला रोखण्याचा प्रयत्न केले जाईल याची जाणीव असल्यामुळे सिंधूनेही नवे डावपेच तयार करण्याची तयारी केली आहे.  जागतिक अजिंक्यपद आणि पुढील आव्हाने याबाबत काय म्हणतेय सिंधू......

या पुढच्या काळात कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल 
दडपण आणि सातत्य या पुढे सर्वात महत्वाचे असेल. विश्वविजेतेपदानंतर आत्ता प्रत्येक जण माझ्या खेळाचा बारकाईने अभ्यास करून मला कोंडीत पडकण्याचा प्रयत्न करेल.  त्यासाठी मला अधिक सजग राहून  काही बदल करावे लागतील. तंत्रातही नव्या क्लुप्त्या तयार कराव्या लागतील. 

पुढच्या कोणत्या स्पर्धांत खेळणार आहे. 
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर पुरेशी विश्रांती घेऊन मी आत्ता पुढील आव्हानासाठी सज्ज होत आहे.  17 ते 22 सप्टेंबर मध्ये होत असलेल्या चायना ओपन स्पर्धेत मी खेळणार आहे त्यानंतर कोरियातील  सुपर 500 (24 ते 29 सप्टेंबर) स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केले आहे. या दोन स्पर्धा माझ्यासाठी आता महत्वाच्या आहेत.  काही दिवसांतच मी चायना स्पर्धेसाठी रवाना होत आहे. सर्वोत्तम खेळ करण्याची मानसिक तयारी केली आहे. जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदाने आत्मविशावास वाढवलेला आहे. टोकियो ऑलिंपिकपूर्वी अशा अनेक स्पर्धा आहेत. दडपण घेण्याऐवजी पूर्ण योगदान देण्यावर माझा भर आहे.

जागतिक स्पर्धेत प्रगती करताना दडपण येत होते का?
या अगोदर मी दोनदा अंतिम फेरीत खेळलेले असल्यामुळे दडपण नव्हते. उपांत्यपूर्व फेरीत ताकदवर ताय झु हिला पराभूत केल्यामुळे आत्मविश्वासाला बळ मिळाले. ओकुहाराविरुद्धच्या अंतिम सामन्याअगोदर काही जण २०१७ मधील अंतिम सामन्याची पुनरावृत्ती होणार का अशी शंक घेत होते. पण मी हा नवा सामना आहे अगोदर काय झाले याचा विचार करत नव्हते. ओकूहाराबरोबर अनेक सामने खेळलेले असल्यामुळे वेगळे डावपेच आखले नव्हते.

कुटूंबाचे योगदान किती महत्वाचे 
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील सुवर्णपदासाठी मी पाच वर्षांपासून वाट पहात होते. प्रत्येक वेळी अपयश येत होते. सहाजिक दुःखी होत होते, पण जिद्द सोडली नव्हती. प्रयत्न करत होते. माझ्या या प्रवासात कुटूंबाचे योगदान फारच महत्वाचे आहे. त्यांनी मला सतत प्रोत्साहन दिले. कधीही माझे मनोबल कमी होऊ दिले नाही. त्यांनी अनेक गोष्टींचा माझ्यासाठी त्यागही केलेला आहे.

प्रशिक्षकांचा वाटा किती मोलाचा 
एखादा खेळाडू घडण्यास कुटूंबाप्रमाणे प्रशिक्षकांचाही वाटा मौल्यवान असतो. माझे पहिले प्रशिक्षक मेहबूब अली होते. त्यानंतर वयाच्या 10 व्या वर्षापासून गोपीचंदसरांनी मला घडवले. केवळ बॅडमिंटनच्या तंत्रांचेच मार्गदर्शन त्यांनी केले नाही तर माझी मानसिकताही सक्षम करण्यात निर्णायक भूमिका बचावली त्यामुळे प्रत्येक यशाचे श्रेय मी या सर्व मार्गदर्शनांना देईन.  

सक्षम आणि पूर्ण ज्ञान असलेल्या  प्रशिक्षकांची आपल्याकडे उणिव आहे , असे गोपीचंद म्हणाले होते, त्या विषयी तुला काय वाटते ? 
सध्याच्या युगात प्रतिस्पर्धी ताकदवर होत असताना आपल्याकडे उच्च प्रतीच्या प्रशिक्षकांची गरज आहे. चॅम्पियन खेळाडू तयार करण्यासाठी अशा प्रशिक्षकांनी छोट्या छोट्या गोष्टींचीही जाण असणे आवश्यक आहे. गोपीसर हे स्वतः महान खेळाडू होते आणि ते आता सर्वश्रेष्ठ मार्गदर्शकही आहेत. आता आपल्याकडे परदेशी मार्गदर्शक आले आहे. त्यांचाही उपयोग होत असतो, पण राष्ट्रीय प्रशिक्षक निष्णांत आणि चांगले ज्ञान असलेले हवेत. खेळाडूंमधून गुणवत्ता शोधून ते चॅम्पियन खेळाडू घडवू शकतील.

परदेशी प्रशिक्षकांबाबत... 
गेल्या एक दोन महिन्यांपासून मी किम जि ह्यून या कोरियन प्रशिक्षकांकडून सराव करत आहेत. गोपीसरही त्यात मदत करत आहेत. केवळ एखादा फटका महत्वाचा नसतो तर प्रत्येक फटका कसा निर्दोष आणि फलदायी ठरेल यावर अभ्यास करत आहे. त्याचबरोबर बचाव आणि नेट जवळ तसेच बेसलाईनवरच्या खेळातही मेहनत घेत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PV Sindhu World Championships Badminton Championship