विश्‍वविक्रमानंतर नदालची ऑस्ट्रियाच्या थीमविरुद्ध हार 

वृत्तसंस्था
रविवार, 13 मे 2018

स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदाल याला क्‍ले कोर्टवरील विश्‍वविक्रमाला विजेतेपदाची झळाळी देण्यात अपयश आले. माद्रिद ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमने नदालला 7-5, 6-3 असे दोन सेटमध्येच हरविले. 

माद्रिद -  स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदाल याला क्‍ले कोर्टवरील विश्‍वविक्रमाला विजेतेपदाची झळाळी देण्यात अपयश आले. माद्रिद ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमने नदालला 7-5, 6-3 असे दोन सेटमध्येच हरविले. 

गतविजेत्या नदालने या स्पर्धेत क्‍ले कोर्टवर सलग 50 सेट जिंकले. एकाच प्रकारच्या कोर्टवर सलग सेट जिंकण्याचा जॉन मॅकेन्रो यांचा 49 सेटचा उच्चांक त्याने मोडला. त्यानंतर पुढच्याच सामन्यात नदालची यशोमालिका खंडित झाली. यामुळे त्याला जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानही गमवावे लागेल. 

नदालने यंदा मॉंटे कार्लो आणि बार्सिलोना या प्रतिष्ठेच्या स्पर्धांत कारकिर्दीत 11व्या वेळी विजेतेपद मिळविले. थीमला त्याने गेल्या वर्षी अंतिम फेरीत हरविले होते. गेल्या वर्षी रोममधील स्पर्धेत नदाल क्‍ले कोर्टवर थीमविरुद्धच हरला होता. 

ही स्पर्धा पाच वेळा जिंकलेला नदाल म्हणाला, की "माझे फोरहॅंडचे फटके नीट बसत नव्हते. याशिवाय त्याच्या फोरहॅंडवर आक्रमण करण्यासाठी मला बॅकहॅंडचे फटकेही सरस मारता आले नाहीत.' 
 

Web Title: Rafael Nadal beaten by Dominic Thiem as unbeaten run ends