राहुल द्रविडही अडकला; लोकपालांची नोटिस

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून काम करत आहे. सचिन आणि गांगुली यांच्याविरुद्ध अशीच तक्रार करणाऱ्या मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनीच द्रविडविरुद्ध तक्रार केली आहे.

नवी दिल्ली : मंडळाचे लोकपाल निवृत्त न्यायाधिश डी. के. जैन यांनी परस्पर हितसंबधाच्या प्रश्‍नावरून मंगळवारी नोटिस बजावली. 

राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून काम करत आहे. सचिन आणि गांगुली यांच्याविरुद्ध अशीच तक्रार करणाऱ्या मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनीच द्रविडविरुद्ध तक्रार केली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख असताना राहुल द्रविड इंडिया सिमेंट समुहात उपाध्यक्षही आहे. या कंपनीकडे आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाची मालकी देखील आहे. 

लोकपाल जैन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले,""तक्रार आल्यानंतर गेल्याच आठवड्यात मी या संदर्भात खुलासा करण्याची सूचना द्रविड यांना केली आहे. उत्तर देण्यासाठी द्रविड यांना दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यांच्याकडून उत्तर आल्यावर माझी पुढील दिशा अवलंबून राहणार आहे.'' 

दरम्यान, राहुल द्रविड 16 ऑगस्ट रोजी या नोटिसला उत्तर देण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर जैन यांना वाटल्यास तो साक्षीला देखील हजर राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Dravid Gets Conflict of Interest Notice from COA