राहुलचे आशियाई स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगलेच 

वृत्तसंस्था
रविवार, 10 जून 2018

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सोनीपत येथे शनिवारी झालेल्या निवड चाचणीस पुण्याचा राहुल आवारे उपस्थित न राहिल्यामुळे आशियाई स्पर्धेत खेळण्याचे त्याचे स्वप्न भंग पावले. 
 

पुणे - आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सोनीपत येथे शनिवारी झालेल्या निवड चाचणीस पुण्याचा राहुल आवारे उपस्थित न राहिल्यामुळे आशियाई स्पर्धेत खेळण्याचे त्याचे स्वप्न भंग पावले. 

निवड चाचणीसाठी राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरी लक्षात घेतली जाणार नाही, असे सुरवातीला सांगण्यात आले होते. मात्र, राष्ट्रकुल स्पर्धेतील पाचपैकी चार सुवर्णपदक विजेत्यांना संघात थेट प्रवेश देण्यात आला. केवळ राहुललाच (57 किलो) चाचणी देण्यास सांगण्यात आले. हा अन्याय आहे असे मानून, तसेच निवड चाचणीचा निरोप उशिरा कळविल्यामुळे राहुल चाचणीला उपस्थित राहू शकला नाही, असे समजते. 

या संदर्भात महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. ते म्हणाले,""महाराष्ट्राच्या मल्लावर नेहमीच अन्याय होत आला आहे. चाचणी आली की सुशील जखमी होतो आणि संघ निवड झाली की तो तंदुरुस्त असतो. असे प्रत्येकच वेळी कसे घडते. राहुलदेखील राष्ट्रकुल सुवर्ण विजेता आहे. त्यालाही अन्य सुवर्ण विजेत्यांप्रमाणेच न्याय मिळायला हवा होता. तो चाचणी देणार नाही, असे स्पष्ट झाल्यावर मग आम्ही उत्कर्ष काळेला पाठवले. त्याने चांगल्या लढती केल्या.'' 

राहुलचे प्रशिक्षक काका पवार म्हणाले, ""राहुलला चाचणी देण्यास सांगितले होते; पण त्याला चाचणीचा निरोप उशिरा मिळाला. मुळात राहुललाही थेट प्रवेश मिळायला हवा होता. आपल्या एकट्यालाच डावलल्यामुळे तो निराश होता. ही चाचणी हुकली असली तरी आम्ही 2020 ऑलिंपिक लक्ष्य ठेवले आहे.'' 

Web Title: Rahul's dream of playing in Asian Games is broken