श्रीराम सिंगची धाव

श्रीराम सिंगची धाव

मिल्खाप्रमाणे उषाच्या ऑलिंपिक तयारीची फार चर्चा झाली नाही. याउलट तिच्या निवडीची प्रक्रिया वादग्रस्त ठरली होती. ऑलिंपिकपूर्वी आंतरराज्य ऍथलेटिक्‍स स्पर्धेत तिची प्रवेशिका एएफआयने पाठविल्यानंतर काही ऍथलिट्‌सनी आक्षेप घेतला. त्यामुळे उषाने स्पर्धेतूनच माघार घेतली. त्यानंतर मुंबई येथे खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत आणि दिल्ली येथे झालेल्या अंतिम निवड चाचणीत 1982 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेत्या एम. डी. वालसम्मावर मात करून उषाने आपले वर्चस्व सिद्ध केले होते. लॉस एँजेल्सला उषा रवाना झाली त्या वेळी ती हर्डल्स शर्यतीत पूर्णपणे तरबेज झाली नव्हती. ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्यापूर्वी तिने भारतात दोन व अमेरिकेत इंगलवूड अशा फक्त तीन स्पर्धांत भाग घेतला होता. इंगलवूड येथील स्पर्धेत उषाने अमेरिकेच्या ज्युडी ब्राऊनचा पराभव केला. यामुळे उषा पदकाच्या शर्यतीत आली होती. पूर्व जर्मनीसह काही देशांनी ऑलिंपिकवर बहिष्कार टाकल्याने उषाला पदकाची नामी संधी होती. मात्र, रुमानियाच्या ख्रिस्तियाना कोयोकारूने अंतिम रेषेवर उषाला मागे टाकले आणि 55.41 सेकंदासह ब्रॉंझपदक जिंकले. उषाला 55.42 सेकंदासह मिल्खाप्रमाणे चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मोरोक्कोच्या मौतावकेलने 54.61 सेकंदासह सुवर्ण, अमेरिकेच्या ज्युडी ब्राऊनने 55.20 सेकंदासह रौप्यपदक जिंकले. उषाचे 100, 200 व 400 मीटरचे राष्ट्रीय विक्रम इतिहासजमा झाले असले तरी हर्डल्समधील राष्ट्रीय विक्रम अजूनही अबाधित आहे. मिल्खाप्रमाणेच उषालाही वाटते की तिचे विक्रम योग्य पद्धतीने मोडले गेले नाहीत. 


रोममध्ये मिल्खा इतिहास घडवीत असताना गुरबचनसिंग रंधावा या युवा सरदारचे ऑलिंपिक पदार्पण झाले होते. रोममध्ये गुरबचन यांनी डेकथलॉन व उंच उडीत भाग घेतला होता. चार वर्षांनंतर पूर्ण तयारीनिशी ते 110 हर्डल्स शर्यतीत सहभागी झाले. प्राथमिक फेरीत 14.3 सेकंदाची वेळ देत "फास्टेस्ट लुझर‘सह ते उपांत्य फेरीत दाखल झाले. उपांत्य फेरीत दुसरे स्थान मिळवीत त्यांनी अंतिम फेरी गाठली. 45 मिनिटांनंतर अंतिम फेरीत 14.0 सेकंदासह ते पाचव्या स्थानी आले. हा त्यांचा राष्ट्रीय विक्रम नंतर 2001 मध्ये गुरप्रीत सिंगने मोडीत काढला. 12 वर्षांनंतर राजपुताना रायफल्सचा जवान श्रीराम सिंग याने 1976 च्या मॉंट्रियल ऑलिंपिकमध्ये आठशे मीटरमध्ये अंतिम फेरी गाठून इतिहास घडविला. प्राथमिक फेरीत श्रीराम सिंग यांनी 1 मिनिट 45.8 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला आणि उपांत्य फेरीत 1 मिनिट 46.2 सेकंदाची वेळ देत अंतिम फेरी गाठली. अंतिम शर्यतीत वेगवान प्रारंभ केल्यानंतर अंतिम टप्प्यात त्यांना वेग कायम ठेवता आला नाही. याचा फायदा सुवर्णपदक विजेत्या क्‍युबाच्या अल्बर्तो जुआंतोरेना यांना झाला. अल्बर्तो यांनी 1 मिनिट 43.50 सेकंदाच्या विश्‍वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले. श्रीराम सिंग यांनी 1 मिनिट 45.77 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम करीत सातवे स्थान मिळविले. अजूनही हा विक्रम अबाधित आहे.
 

उषाच्या कामगिरीनंतर तब्बल 20 वर्षांनंतर अथेन्स येथे भारतीय ऍथलिट्‌ला अंतिम फेरी गाठण्यात यश प्राप्त झाले. मात्र, या वेळी ट्रॅकऐवजी फिल्ड इव्हेंटमध्ये अंतिम फेरी होती. अंजू जॉर्जने लांब उडीत अंतिम फेरी गाठताना 6.83 मीटर कामगिरीसह सहावे स्थान प्राप्त केले. काही वर्षांनी अमेरिकेची मरियन्स जोन्स उत्तेजक सेवनात सापडल्याने अंजू जॉर्जच्या कामगिरीत सुधारणा करताना पाचवे स्थान देण्यात आले. ऑलिंपिकच्या इतिहासात प्रथमच भारतीय थ्रोवर्सने लंडनमध्ये अंतिम फेरी गाठली. थाळीफेकपटू विकास गौडाने 64.79 मीटरसह आठवे तर कृष्णा पुनियाने 63.62 मीटरसह सहावे स्थान मिळविले. 1948 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या दोन भारतीयांची फारशी चर्चाच होत नाही. तिहेरी उडीतील ऍथलिट्‌ हेन्री रिबेल्लोने अंतिम फेरी गाठली खरी; मात्र स्नायू दुखावल्याने त्यांना अंतिम फेरीत सहभागी होता आले नाही. लांब उडीत बलदेव सिंगनेही अंतिम फेरी गाठली होती. मात्र, दुखापतीमुळे ते अंतिम फेरीत सहभागी होऊ शकले नाहीत. मॅरेथॉन धावक शिवनाथ सिंगच्या उल्लेखाशिवाय ऑलिंपिकमधील भारतीय ऍथलिट्‌स हा विषय पूर्णच होऊ शकत नाही. 1976 च्या मॉंट्रियल ऑलिंपिकमध्ये शिवनाथ सिंग कमीत-कमी ब्रॉंझपदकाचे दावेदार होते. 30 किलोमीटरपर्यंत ते आघाडीवर होते. मात्र, त्यांना अखेर 11 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांनी 2 तास 16 मिनिटे 22 सेकंद अशी वेळ दिली होती. अजूनही पदकाची प्रतीक्षा कायम आहे. प्रत्येक चार वर्षांनी यावर चर्चा होते. मात्र, तो सोनेरी क्षण कधी येणार हे काळच सांगेल.

के. पी. मोहन, ऍथलेटिक्‍स अभ्यासक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com