Ranji Trophy: बंगालची अंतिम फेरीत थाटात एन्ट्री! गतविजेत्या मध्य प्रदेशला चारली पराभवाची धूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranji Trophy 2022-23

Ranji Trophy: बंगालची अंतिम फेरीत थाटात एन्ट्री! गतविजेत्या मध्य प्रदेशला चारली पराभवाची धूळ

Ranji Trophy 2022-23: रणजी ट्रॉफी 2022-23 चा पहिला उपांत्य सामना मध्य प्रदेश आणि बंगाल यांच्यात इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या गेला. दोन वेळा बंगाल रणजी चॅम्पियन झाली आहे तर 15व्यांदा अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. सामन्याच्या चौथ्या डावात मध्य प्रदेश संघाला 548 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले होते, परंतु संघ केवळ 241 धावांवरच गडगडला आणि बंगालने 306 धावांनी विजय मिळवला.

बंगालसाठी सामन्याच्या चौथ्या डावात डावखुरा फिरकी गोलंदाज प्रदिप्ताने केवळ 10.5 षटकांत 51 धावा देत मध्यप्रदेशच्या अर्ध्या संघाची शिकार केली. त्याच्याशिवाय मुकेश कुमारने 2 तर शाहबाज अहमद आणि आकाश दीपने 1-1 विकेट घेतली. मध्य प्रदेशच्या संघाच्या दुसऱ्या डावात रजत पाटीदारने 52 धावांची खेळी केली, मात्र दुसऱ्या टोकाकडून एकाही फलंदाजाची साथ न मिळाल्याने त्याला संघाला लक्ष्याच्या दिशेने नेण्यात यश आले नाही. बंगालच्या सामन्यात आकाश दीपने शानदार गोलंदाजी करत सामनावीराचा किताब पटकावला. आकाश दीपने पहिल्या डावात पंजा उघडला.

या सामन्यात बंगाल संघाचा कर्णधार मनोज तिवारीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज 51 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर मजुमदार आणि सुदीप यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 200 हून अधिक धावांची भागीदारी पाहायला मिळाली. मजुमदारने 120 धावांची खेळी खेळली, तर सुदीपच्या बॅटमधून 112 धावा आल्या.

या दोन्ही फलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर बंगालच्या संघाला पहिल्या डावात 438 धावांपर्यंत मजल मारता आली. यानंतर मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली त्यांचा संघ केवळ 170 धावांवर आटोपला, ज्यामध्ये बंगालकडून आकाश दीपने 5 विकेट घेतल्या.

बंगाल संघाच्या दुस-या डावात अनुस्तुपची 80 धावांची शानदार खेळी बॅटने पाहायला मिळाली, याशिवाय प्रदीपानेही नाबाद 60 धावा केल्या, ज्यामुळे संघाला 279 धावांपर्यंत मजल मारता आली आणि मध्य प्रदेशला 548 धावांचे लक्ष्य दिले. रणजी ट्रॉफीच्या या मोसमातील विजेतेपदाचा सामना 16 फेब्रुवारीला होणार आहे.

टॅग्स :Ranji Trophy