वर्ल्ड कपनंतर गुलबदीनला हाकलले; राशिद नवा कर्णधार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जुलै 2019

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपयशी कामगिरीनंतर अफगाणिस्तान संघाने फिरकी गोलंदाज रशिद खान याला क्रिकेटच्या तीनही प्रकारासाठी कर्मधारपदी नियुक्त करून मोठे पाऊल टाकले आहे. 

काबूल : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपयशी कामगिरीनंतर अफगाणिस्तान संघाने फिरकी गोलंदाज रशिद खान याला क्रिकेटच्या तीनही प्रकारासाठी कर्मधारपदी नियुक्त करून मोठे पाऊल टाकले आहे. 

विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अगदी ऐनवेळी अफगाणिस्तानने असघर अफगाणकडून नेतृत्व काढून घेत गुलबदिन नईबची घोषणा केली होती. मात्र, या नियुक्तीबाबत संघात नाराजी होती. त्याचे परिणाम कमी अधिक प्रमाणात विश्‍वकरंडक स्पर्धेच्या कामगिरीवर उमटले. अफगाणिस्तानला स्पर्देत एकही सामना जिंकता आला नाही. 

अफगाणिस्तान संघ निवड समितीचे अध्यक्ष दवलत खान अहमदझाई म्हणाले,""विश्‍वकरंडक स्पर्धेत सर्वच संघ तुल्यबळ आणि अनुभवी होते. यानंतरही आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. विजयापर्यंत पोचण्यासाठी प्रत्येक खेळाडूने योगदान दिले. पण, आम्ही दुर्दैवी ठरलो. विश्‍वकरंडक स्पर्धेतील कामगिरी प्रेरणा मानून आम्ही पुढे जाऊ. यासाठी संघात काही बदल करण्यात आले. त्यानुसार आम्ही नेतृत्व बदलण्याचा निर्णय घेतला.'' 

अफगाणिस्तान संघ आता सप्टेंबर महिन्यात बांगलादेशविरुद्ध एकमात्र कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर तेथेच ते बांगलादेश, झिंबाब्वेसह तिरंगी एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहेत. त्यानंतर ते वेस्ट इंडिज अफगाणिस्तानचा दौरा करणार असून, यात तीन टी 20, तीन एकदिवसीय आणि एक कसोटी सामना होईल. ही मालिका भारतात खेळविली जणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rashid Khan appointed as new captain of Afghanistan