esakal | फिडे ऑनलाइन ऑलिंपियाडमध्ये आज भारत-रशिया सामना
sakal

बोलून बातमी शोधा

ratnagiri : today india russia match FIDE online olympiad

अंतिम सामना रशिया विरुद्ध भारत असा होणार असून आज भारतीय वेळेनुसार दुपारी 4.15 पासून थेट प्रक्षेपण सुरू होईल.

फिडे ऑनलाइन ऑलिंपियाडमध्ये आज भारत-रशिया सामना

sakal_logo
By
मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : जागतिक बुद्धिबळ संघटना अर्थात फिडेने आयोजित केलेल्या पहिल्या जागतिक ऑनलाइन ऑलिंपियाडच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने धडक मारली आहे. अंतिम सामना रशिया विरुद्ध भारत असा होणार असून आज भारतीय वेळेनुसार दुपारी 4.15 पासून थेट प्रक्षेपण सुरू होईल. याकडे बुद्धिबळपटू आणि बुद्धिबळप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. जगज्जेता विश्‍वनाथन आनंद व टीमकडे सार्‍यांचे लक्ष आहे.

हेही वाचा - चार हातांनी दिली दोन पायांना उभारी..! कुठे घडली घटना ? वाचा सविस्तर...

सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाच्या काही नियमावलीमुळे सध्या सगळीकडेच कला-क्रीडा क्षेत्रात ऑनलाइन पद्धतीने नवनवीन अभिनव प्रयोग केले जात आहेत. जागतिक बुद्धिबळ संघटनेनेही पुढाकार घेऊन या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत तब्बल 160 हून अधिक देशांनी सहभाग घेतल्याची माहिती रत्नागिरीचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहनी यांनी दिली. प्रत्येक देशातील खेळाडूंच्या गुणांकनानुसार स्पर्धेत एकूण 5 गट करण्यात आले आहेत. 

भारतीय संघाचे नेतृत्व नाशिकचा विदिथ गुजराथी करत असून श्रीनाथ नारायणन उपकप्तानपद आणि तांत्रिक जबाबदारी सांभाळत आहे. पाच वेळा जगज्जेता झालेला भारताचा विश्‍वनाथन आनंद, विदिथ गुजराथी, पी. हरिकृष्णा, अरविंद चिदंबरम हे अनुभवी तर निहाल सारीन आणि आर. प्रग्नानंधा यांच्यासारख्या युवा ग्रँडमास्टर्सच्या जोडीने जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेची विजेती कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली, भक्ती कुलकर्णी यांच्यासारख्या अनुभवी महिला खेळाडू आणि दिव्या देशमुख, आर. वैशाली, वन्तिका अग्रवाल यांच्यासारख्या युवा महिला खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व या स्पर्धेत करत आहेत.

उपांत्य सामन्यात पहिल्या फेरीत भारताला पोलंड कडून 2-4 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. स्पीड गन म्हणून ओळखल्या जाणार्‍या निहाल सरीनने एकमेव विजयाची नोंद केली. तर हम्पी आणि हरिका यांनी आपापले डाव बरोबरीत सोडवले. विदित, आनंद आणि दिव्या यांना या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. उपांत्य गटाच्या दुसर्‍या फेरीत मात्र भारताने जोरदार मुसंडी मारत 4.5 - 1.5 असा विजय मिळवत स्पर्धेतील अस्तित्व कायम ठेवले.

हेही वाचा -  काजू पीक देखील आता बेभरवाशाचे, काय आहेत कारणे? 

जगज्जेत्या आनंदने पहिलाच डाव अगदी मोक्याच्या क्षणी जिंकला. विदित, हम्पी, हरिका यांनीदेखील आपले डाव जिंकत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दोन फेर्‍यांची ही उपांत्य लढत 1-1 अशी बरोबरीत सुटल्याने आर्मगडन (टाय ब्रेकर) गेमवर आपल्या संघाचे सामन्यातील भवितव्य अवलंबून होते. भारताची सुपरवूमन कोनेरू हम्पी हिने या गेममध्ये विजय मिळवत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश निश्‍चित केल्याने एक पदक निश्‍चित झाले आहे.

संपादन - स्नेहल कदम