जीवनातील चढ-उतारांना सामोरे जाण्यासाठी धावा!

जीवनातील चढ-उतारांना सामोरे जाण्यासाठी धावा!

पुणे : जीवनात अनेक चढ-उतार येतात तेव्हा तुमचा चेहरा प्रश्‍नांकित अन्‌ मन चिंताक्रांत बनते. आपण हे करू शकू का अशी शंका तुम्हाला खायला उठते. तुम्ही अगदी मॅरेथॉन नाही तरी कोणतीही रोड रेस धावलात तरी अशा चढ-उतारांचा सामना करू शकाल, असा सल्ला देत अमेरिकेचा ऑलिंपियन मॅरेथॉनपटू रायन हॉल याने नऊ डिसेंबरला होणाऱ्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनची पर्वणी साधण्याची साद राज्यभरातील क्रीडाप्रेमींना घातली. 

रायन स्पर्धेचा ब्रॅंड अँबेसिडर आहे. मुख्य म्हणजे तो अर्धमॅरेथॉनमध्ये एका तासापेक्षा कमी वेळ नोंदविलेला पहिला अमेरिकी धावपटू आहे. साहजिकच त्याचा सल्ला बहुमोल ठरतो. 

मॅरेथॉन किंवा कोणतीही शर्यत तुमची कसोटी पाहते. याविषयी स्वतःचा अनुभव सांगताना तो म्हणाला, की धावण्यातून तुम्ही खूप काही शिकू शकता. तुम्हाला स्वतःविषयी सुद्धा बरेच काही समजते. खडतर क्षणी तुम्हाला वाटते की अरे बापरे, अजून किती अंतर बाकी आहे? मी फिनीश लाइन गाठू शकेन की नाही? मला एनर्जी पुरेल की नाही? वास्तविक अशा क्षणी आव्हान असते ते बाकी कुठला विचार न करता तो विशिष्ठ टप्पा धावण्याचे. एका वेळी एक पाऊल-एक किलोमीटर इतकाच विचार करायचा. मग मार्ग कितीही खडतर आणि चढ-उतारांचा असला तरी तुम्ही तो गाठल्याशिवाय राहणार नाहीत. 

दीड दशकाची मेहनत 
रायनने 14 जानेवारी 2007 रोजी ह्युस्टन अर्धमॅरेथॉन 59 मिनिटे 43 सेकंद वेळेत पूर्ण केली. या विक्रमी कामगिरीविषयी तो म्हणाला, की असा उच्चांक करणे एका दिवसाची-एका शर्यतीची गोष्ट नसते, तर त्यामागे कित्येक दशकांची मेहनत असते. मी शिस्तबद्ध सराव करायला लागल्यापासून दीड दशकाने हा क्षण आला. 

प्रतीक्षा परिपूर्णतेची 
रायनने मानसिक-भावनिक पातळीर ही वाटचाल सोपी नसल्याचे आवर्जून नमूद केले. तो म्हणाला, की या मार्गात काही दिवस चांगले, तर काही वाईट गेले. तुम्ही चांगले दिवस लक्षात ठेवता, पण वाईटातूनही बोध घ्यायचा असतो. तुमच्या मार्गात दुखापतींचा अडथळा येतो. काही वेळा तुमची प्रेरणाच नष्ट होते. दुखापती, ज्या क्रीडापटूच्या कारकिर्दीचा अविभाज्य घटक असतात, त्याचाही अडथळा येतो. घरातून बाहेरच पडावेसे वाटत नाही. अशावेळी तुम्ही परिपूर्णतेचा ध्यास घ्यावा आणि सराव सुरू ठेवावा. सगले क्‍लिक व्हायला वेळ लागतो आणि एकेदिवशी ते घडते तेव्हा तो सुदिन उजाडतो आणि चिरकाल तुमच्या स्मरणात राहतो. 

एकच सप्लिमेंट्‌ म्हणजे कॉफी! 
ऍथलेटिक्‍समध्ये कामगिरी उंचावण्यासाठी सप्लिमेंट्‌स घेण्याचा प्रघात आहे. रायनच्या संकेतस्थळावरून मात्र तो कॉफीचा शौकीन असल्याचे दिसले. याविषयी त्याने सांगितले, की मला एकच सप्लिमेंट ठाऊक आहे आणि तो म्हणजे कॉफी. कारकीर्द सुरू असताना कॉफी घेण्याबाबत माझे विशिष्ट धोरण असायचे. वर्कआउट तसेच शर्यतीच्या सव्वा तास आधी मी कॉफी घ्यायचो. त्यामुळे फिनिश लाइन पार करण्याची प्रेरणा मला मिळायची. आता निवृत्तीनंतर मी दररोज कॉफी पिण्याचा आनंद लुटतो. मला कॉफीचे सामाजिक-सांस्कृतिक जीवनाशी जुळलेने नातेसंबंध भावतात. 

"फॅमिली रन' भावली 
मला चार मुले आहेत. मला त्यांच्याबरोबर अधिकाधिक काळ व्यतीत करायला आवडते. यासंदर्भात मला फॅमिली रनची संकल्पना मला भावली आहे. ते या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरेल. सहा किमी अंतराचा हा गट ठेवल्याबद्दल संयोजकांना शाबासकी द्यायला हवी, असे रायनने सांगितले. 

मार्ग-हवामान अनुकूल 
रायनच्या स्वागतासाठी निगडी येथे संयोजकांनी धावपटूंना एकत्र आणले आणि त्यांच्या साथीत रायन धावला. त्या वेळचे थंड हवामान शर्यतीला अनुकूल असल्याचे निरीक्षण रायनमधील मॅरेथॉनपटूने टिपले. तो म्हणाला, की नऊ डिसेंबरपर्यंत थंडी आणखी वाढलेली असेल आणि असे हवामान स्पर्धकांना अनुकूल आणि शर्यतीसाठी आदर्श असेल. मार्गसुद्धा वेगवान आणि ठराविक वेगाने सातत्यपूर्ण दौड करण्यास अनुकूल असेल. कारकीर्द सुरू असताना असे वातावरण पाहून माझ्यातील व्यावसायिक धावपटू रोमांचित व्हायचा आणि धावण्यास सज्ज व्हायचा. तुम्ही धावपटूंना अशा शर्यतीमुळे उत्तम संधी मिळाली आहे आणि तुम्ही याचा फायदा उठविला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com