रशियाच्या स्वागताने पाहुणे भारावले 

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 जून 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या ज्वराने मॉस्को तापले आहे. रशियातील नागरिकांच्या आपलेपणाने हे पाहुणे भारावले आहेत. भाषेची, तसेच अन्य कोणतीही अडचण येत नसल्यामुळे स्पर्धेचा पुरेपूर आनंद घेता येईल, याची त्यांना खात्री पटली आहे. 
 

मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या ज्वराने मॉस्को तापले आहे. रशियातील नागरिकांच्या आपलेपणाने हे पाहुणे भारावले आहेत. भाषेची, तसेच अन्य कोणतीही अडचण येत नसल्यामुळे स्पर्धेचा पुरेपूर आनंद घेता येईल, याची त्यांना खात्री पटली आहे. 

पेरूच्या पाठीराख्यांना, तर रशियन्स आपल्याबरोबर छायाचित्र काढून घेण्यास उत्सुक आहेत, याचेच नवल वाटत होते. त्यातील अनेकांना सारांस्क येथील पहिल्या लढतीसाठी जाण्यास त्रास होईल, असे वाटत होते. त्यातच विमान तसेच रेल्वेचे तिकीट नसल्याने चिंता वाढली होती, पण त्यांना बसबाबत माहिती समजली आणि त्याचे तिकीटही सहज मिळाल्याने ते खूष होते. 

विश्‍वकरंडकाची सर्वाधिक वर्दळ मॉस्कोतच असेल. याच शहरात उद्‌घाटनाची, तसेच समारोपाची लढत होईल. त्याशिवाय दहा लढतीही होणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रगतिशील मॉस्को दाखविण्याची योजना यशस्वी होईल, असा प्रशासनास विश्‍वास वाटत आहे. 

कोलंबिया, इंग्लंड, इजिप्त या देशांच्या चाहत्यांनी स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांनी मॉस्कोतच आपल्या संघास प्रोत्साहन देण्यास सुरुवातही केली आहे. याच वेळी येथील मेक्‍सिको दूतावासाने आपल्या देशांच्या लढती मोठ्या स्क्रीनवर बघण्याची सोय केली आहे, त्याच वेळी आपल्या देशाच्या चाहत्यांबरोबरच मेक्‍सिकोच्या प्रतिस्पर्धी देशांच्या चाहत्यांनाही निमंत्रित केले आहे. 

बाराशे ब्रिटिश चाहत्यांना प्रतिबंध 
ब्रिटनमधील बाराशेहून जास्त फुटबॉल रसिकांना रशियात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. ब्रिटनमधील पोलिसांनी या हुल्लडबाजांचे पासपोर्टही ताब्यात घेतले आहेत. आतापर्यंत 1 हजार 254 पासपोर्ट जमा केले आहेत. त्याशिवाय अजून एक हजार व्यक्तींचे पासपोर्ट जमा केले जातील, असे सूत्रांनी सांगितले. स्पर्धेतील अंतिम लढत होईपर्यंत त्यांचे पासपोर्ट आमच्याकडेच असतील, असे पोलिसांनी सांगितले. 

 

Web Title: The reception of Russias is very nice