वेळीच सावरलेली "मल्टिपल' ऑलिंपियन

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 जून 2016

उन्हाळी; तसेच हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांत सहभागी होऊन पदके जिंकणारी कॅनडाची क्‍लॅरा ह्यूज ही मोजक्‍याच "मल्टिपल‘ ऑलिंपियनपैकी एक. तारुण्याच्या प्रारंभी धूम्रपान, दारू, ड्रग्ज यांच्या विळख्यात अडकण्याच्या वाटेवर असताना ही मुलगी वेळीच सावरली. तिच्या क्रीडा कारकिर्दीला नवी आशादायी दिशा गवसली. सुरवातीच्या आपल्या दुर्गुणांची कबुली क्‍लॅराने एकदा मुलाखतीत दिली होती. 1988 मध्ये दूरचित्रवाणीवर स्पीड स्केटिंगमधील चुरस पाहून तिच्यात क्रांतिकारी परिवर्तन झाले. आपणही ऑलिंपियन बनावे, ही ईर्षा तीव्र झाली. 16-17 वर्षांची असताना क्‍लॅरा स्पीड स्केटिंग व सायकलिंगमध्ये पारंगत झाली होती.

उन्हाळी; तसेच हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांत सहभागी होऊन पदके जिंकणारी कॅनडाची क्‍लॅरा ह्यूज ही मोजक्‍याच "मल्टिपल‘ ऑलिंपियनपैकी एक. तारुण्याच्या प्रारंभी धूम्रपान, दारू, ड्रग्ज यांच्या विळख्यात अडकण्याच्या वाटेवर असताना ही मुलगी वेळीच सावरली. तिच्या क्रीडा कारकिर्दीला नवी आशादायी दिशा गवसली. सुरवातीच्या आपल्या दुर्गुणांची कबुली क्‍लॅराने एकदा मुलाखतीत दिली होती. 1988 मध्ये दूरचित्रवाणीवर स्पीड स्केटिंगमधील चुरस पाहून तिच्यात क्रांतिकारी परिवर्तन झाले. आपणही ऑलिंपियन बनावे, ही ईर्षा तीव्र झाली. 16-17 वर्षांची असताना क्‍लॅरा स्पीड स्केटिंग व सायकलिंगमध्ये पारंगत झाली होती. या खेळांत कारकीर्द करण्याचे तिने निश्‍चित केले. 1996 ते 2012 या कालावधीत मिळून ती दोन्ही प्रकारच्या ऑलिंपिकच्या सहा स्पर्धांत सहभागी झाली. उन्हाळी ऑलिंपिकमध्ये दोन; तर हिवाळी ऑलिंपिकमध्ये चार मिळून एकूण सहा पदके जिंकली. चार वर्षांपूर्वी लंडन ऑलिंपिकमध्ये तिने पुनरागमन केले. सायकलिंगमध्ये कॅनडाचे प्रतिनिधित्व केले. रोड टाइम ट्रायल प्रकारात पाचवा क्रमांक मिळवून तिने ऑलिंपिक कारकिर्दीस पूर्णविराम दिला. त्यापूर्वी दोन वर्षेअगोदर ती हिवाळी ऑलिंपिकमधून निवृत्त झाली होती.

1996 मध्ये अटलांटा येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत क्‍लॅराने रोड रेस व टाइम ट्रायल प्रकारात भाग घेतला. दोन्ही शर्यतींत तिने ब्रॉंझपदके जिंकली. सायकलिंगमध्ये ऑलिंपिक पदक जिंकणारी ती पहिलीच कॅनेडियन महिला ठरली. क्‍लॅरा ही 18 वेळची कॅनेडियन राष्ट्रीय सायकलिंग विजेती आहे. 2000 मधील सिडनी ऑलिंपिकमध्ये ती सहभागी झाली; पण पदकाने हुलकावणी दिली. 2002 मध्ये तिने हिवाळी ऑलिंपिकमध्ये पदार्पण केले. सॉल्ट लेक सिटी येथे झालेल्या स्पर्धेत तिला ब्रॉंझपदक मिळाले; तर 2006 मध्ये तुरिन येथील स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. ऑलिंपिक कारकिर्दीतील तिची ही पहिलीच "गोल्डन‘ कामगिरी ठरली. 2010 मध्ये कॅनडातील व्हॅंकूव्हर येथील ऑलिंपिकनंतर तिने हिवाळी स्पर्धेचा निरोप घेतला. घरच्या मैदानावर तिने ब्रॉंझपदकाची कमाई केली. तिने सर्व पदके 5000 मीटरमध्ये पटकाविली.
क्‍लॅरा ह्यूज यशस्वी ऑलिंपियन आहेच, त्याचवेळी मानवतावादी कार्यासाठीही प्रसिद्ध आहे. "राईट टू प्ले‘ या मानवतावादी संस्थेत ती सक्रिय आहे. युवा विकास हे या संस्थेचे उद्दिष्ट्य आहे. तिच्या या कार्याची दखल घेऊन तिला वेळोवेळी गौरविण्यातही आले आहे. कॅनडा सरकारनेही सन्मानित केले. 2006 मध्ये तिने सुवर्णपदक जिंकले. त्या वेळी तिने 10,000 डॉलर "राईट टू प्ले‘च्या खात्यात जमा केले. त्याचवर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) तिला "क्रीडा आणि सामाजिक‘ करंडकाने गौरविले.

क्‍लॅरा ह्यूजची ऑलिंपिक कामगिरी
उन्हाळी ऑलिंपिक
- 1996, अटलांटा ः ब्रॉंझपदक (रोड रेस आणि टाइम ट्रायल)
हिवाळी ऑलिंपिक
- 2002, सॉल्ट लेक सिटी ः ब्रॉंझपदक (5000 मीटर)
- 2006, तुरिन ः सुवर्णपदक (5000 मीटर), रौप्यपदक (सांघिक)
- 2010, व्हॅंकूव्हर ः ब्रॉंझपदक (5000 मीटर)

Web Title: Rio Olympics Countdown start