फेडररसाठी बावीसावं वरीसही ठरणार धोक्याच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Roger Federer
फेडररसाठी बावीसावं वरीसही ठरणार धोक्याच!

फेडररसाठी बावीसावं वरीसही ठरणार धोक्याच!

स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर आगामी वर्षातील पहिल्या वहिल्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेपासूनही दूर राहण्याची शक्यता आहे. फेडररचे कोच इवान लुबिचिच यांनी त्याच्या खेळण्यासंदर्भात शंका उपस्थितीत केली आहे. जर तो स्पर्धेत उतरला नाही तर सलग दुसऱ्या वर्षी तो या प्रतिष्ठीत स्पर्धेला मुकेल. मागील वर्षीही त्याने या स्पर्धेतून माघार घेतली होती.

20 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा फेडरर मागील काही काळापासून दुखापतीनं त्रस्त आहे. पायाच्या दुखापतीवर उपचार करताना त्याच्यावर तीन वेळा शस्त्रक्रीया करण्यात आलीये. जुलैमध्ये फेडरर विम्बल्डनच्या कोर्टवर उतरल्याचे पाहायला मिळाले होते. क्वार्टर फायनलमधील पराभवानंतर तो कोणतीच स्पर्धा खेळलेला नाही. 40 वर्षीय फेडररची 2020 च्या फेब्रुवारीमध्ये आणि मार्चमध्ये दोन वेळा आर्थरोस्कोपिक सर्जरी करण्यात आली.

हेही वाचा: ICC Most Valuable Team : बाबर कॅप्टन; टीम इंडियातील खेळाडूंची किंमत शून्य!

2020 पासून फेडरर केवळ पाच स्पर्धेत खेळला

मागील दिड वर्षांच्या काळात फेडरर अवघ्या 5 स्पर्धेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. फेडररने 2000 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत 22 वर्षांच्या काळात केवळ मागील वर्षी तो या स्पर्धेला मुकला होता. आता पुन्हा हीच वेळ त्याच्यावर येण्याची शक्यता दिसते.

हेही वाचा: ICC च्या फ्रेममध्ये दिसले विराट-बाबर यांच्यातील प्रेम

फेडरर पुन्हा येईल....

फेडरर सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा मुकणार असला तरी याचा अर्थ तो थांबणार आहे. निवृत्तीचा विचार करतोय, असा होत नाही. याच कारण त्याचे कोच लुबिचिच यांनी तो लवकरच कोर्टवर कमबॅक करणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. फेडरर दुखापतीतून सावरत असून शंभर टक्के फिटनेसशिवाय तो कोर्टवर उतरणार नाही, असे त्याच्या कोचने म्हटले आहे.

निवृत्तीचा कोणताही विचार नाही

लुबिचिच यांनी फेडरर निवृत्तीचा कोणताही विचार करत नाही, असेही स्पष्ट केले आहे. यासंदर्भात फेडररसोबत चर्चा केली असून कोर्टवर पुन्हा उतरण्याचा त्याला आत्मविश्वास असल्याचे ते म्हणाले. मागील महिन्यात फेडरर पुरुष टेनिस क्रमवारीत अव्वल 10 मधून बाहेर पडला होता. जानेवारी 2017 नंतर पहिल्यांदा फेडररवर टॉप टेनमधून बाहेर पडण्याची वेळ आली आहे.

loading image
go to top