INDvWI : रोहित-राहुलनंतर विराटनेही धुतले; विंडीजपुढे 241 धावांचे आव्हान!

INDvWI-Kohli-Rahul
INDvWI-Kohli-Rahul

मुंबई : मालिका गमावण्याची भीती आणि त्यामुळे निर्माण झालेली अस्तित्वाची लढाई अशा चक्रव्युहात सापडलेल्या भारतीय फलंदाजांनी अतिशय तादकवर प्रहार वेस्ट इंडीजवर केला आणि तिसऱ्या व अंतिम ट्वेन्टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 240 धावांचा डोंगर उभा केला.

धावांचा पाठलाग करण्यात तरबेज असलेला भारतीय संघ प्रथम फलंदाजी मात्र वारंवार अपयशी ठरतो अशी आकडेवारी सांगते. आजही नाणेफेक गमावल्यावर प्रथम फलंदाजी करण्याचा वेळ आली, पण रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी वेस्ट इंडीज गोलंदाजीचे बारा वाजवले. त्यांच्या 135 धावांची तुफानी सलामीनंतर विराट कोहलीने  सात षटकार आणि चार चौकाराचे काजवे चमकवले. 

रोहित शर्माचा स्टान्स (पवित्रा) आज काही तरी स्फोटक घडणार आहे याची चुणूक दाखवणारा होता. कॉड्रेलच्या पहिल्या षटकात एक चौकार मारण्यात आला ही एक नांदी होती त्यानंतर दोन्ही बाजूने तडाखा सुरु झाला.

एका बाजूने रोहित तर दुसऱ्या बाजूने राहूल चौकार-षटकारांची जणू काही माळच ओवत होते. कॉड्रेलच्या दुसऱ्या आणि डावातील तिसऱ्या षटकात 16 धावांची वसूली झाली आणि भारताच्या खात्यात 3 षटकांत 30 धावा जमा झाल्या तेव्हाच मोठी धावसंख्या उभारली जाणार हे स्पष्ट झाले होते.

4 षटकांत 44 आणि 5 षटकांत 58 असा भारताच्या आलेख रॉकेटप्रमाणे वर जात होता. क्षेत्ररक्षण मर्यादेच्या पहिल्या सहा षटकांत 72 धावा फटकावण्यात आल्यानंतर फिरकी गोलंदज पेरी याच्या एका षटकांत तर रोहितने सलग दोन षटकार त्यानंतर दोन चौकार मारले स्वतःचे अर्धशतक पूर्ण केले आणि या षटकांत तब्बल 21 धावा कुटण्यात आल्या. डावाचे हे आठवे षटक होते येथे रोहित-राहुल यांनी थेट फेरारीचाच वेग मिळवला.

11 वे षटक या वेगाला ब्रेक लावणारे ठरले. त्यात दोन्ही बाजूचे नुकसान झाले. अगोदर सीमारेषेवर चेंडू अडवताना पाय मुरगळलेल्या एविन लुईसला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले दोन चेंडूनंतर रोहित उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला.

रिषभ पंतला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्याचा प्रयत्न फसल्यानंतर फलंदाजीस आलेल्या कोहलीनेही विराट रुप धारण केले. केसरिक विलियम्सला दोन टोलेजंग षटकार खेचून `पावती` फाडणारा प्रहार केला. अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक करून मुंबईकर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

संक्षिप्त धावफलक : भारत 20 षटकांत 3 बाद 240 ( रोहित शर्मा 71 -34 चेंडू 6 चौकार, 6 षटकार, केएल राहुल 91 -56 चेंडू, 9 चौकार, 4 षटकार, विराट कोहली नाबाद 70 -29 चेंडू 4 चौकार, 7 षटकार, कॉट्रेल 40-1)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com