IPL 2019 : विराट बदडणार की बुमरा त्याला रोखणार?

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 मार्च 2019

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या अनुपस्थितीत मर्यादित षटकांच्या सामन्यांत नेतृत्व करणारा रोहित शर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये सलामीच्याच सामन्यात अपयशी ठरले

आयपीएल 2019 : बंगळूर : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या अनुपस्थितीत मर्यादित षटकांच्या सामन्यांत नेतृत्व करणारा रोहित शर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये सलामीच्याच सामन्यात अपयशी ठरले. उद्या दोघे बंगळूर आणि मुंबई इंडियन्स संघांमधून आमनेसामने येत असल्याने पहिल्या विजयासाठी दोघांमध्ये संघर्ष असेल. 

विराट कोहली हा सामना घरच्या मैदानावर खेळणार आहे ही त्याच्यासाठी जमेची बाजू आहे. आयपीएलच्या या 12 व्या मोसमाच्या पहिल्याच सामन्यात चेन्नईविरुद्ध काय घडले हे समजायच्या आतच बंगळूरचा खेळ 70 धावांत खल्लास झाला होता. विराट कोहली, एबी डिव्हिलर्स हे निष्णात फलंदाज फिरकीच्या आखाड्यात गारद झाले होते. उद्या मात्र पुन्हा तशी चूक ते होऊ देणार नाहीत, त्यासाठी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा कस पणाला लागेल. 

मुंबई इंडियन्सचे गोलंदाज पहिल्याच सामन्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांच्यावर अधिक दडपण असेल. दिल्लीने द्विशतकी मजल मारली होती. जसप्रीत बुमरा, मॅक्‍लेनघन, हार्दिक आणि कृणाल पंड्या असे चार-चार आंतरराष्ट्रीय गोलंदाज फिके ठरले होते. उद्या त्यांची गाठ विराट आणि डिव्हिलर्स यांच्याशी आहे. 

बुमरा खेळणार? 
रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेंडू अडवताना बुमराचा खांदा दुखावला होता. त्यानंतर तो फलंदाजीस आला नव्हता. तो तंदुरुस्तीच्या मार्गावर असल्याचे मुंबई इंडियन्सकडून सांगण्यात आलेले आहे, परंतु बुमराने बंगळूरमध्ये सराव करतानाचा व्हिडिओ ट्विट करून उद्याचा सामना खेळणार असल्याचे संकेत दिले, परंतु त्याची तंदुरुस्ती भारतीय संघासाठीही महत्त्वाची असल्यामुळे कदाचित त्याला विश्रांतीही दिली जाऊ शकते. 

मलिंगा उपलब्ध 
देशांतर्गत स्पर्धेऐवजी पूर्ण आयपीएल खेळण्यासाठी श्रीलंका मंडळाने लसिथ मलिंगाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे तो उपलब्ध असेल; मात्र त्याच्यासाठी कोणाला वगळायचे हा प्रश्‍न असेल. क्विंटॉन डिकॉक, किएरॉन पोलार्ड, मॅक्‍लेनघन आणि बेन कटिंग असे चार परदेशी खेळाडू खेळवले होते. गोलंदाजीची ताकद वाढविण्यासाठी कटिंगला वगळले जाऊ शकते. 

फलंदाजीतही सुधारणा आवश्‍यक 
मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही सुधारणा आवश्‍यक आहे. युवराजसिंगचा अपवाद वळगता इतर सर्व प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. बंगळूरकडे उमेश यादव, महंमद सिराज या वेगवान गोलंदाजांसह युझवेंद्र चहल आणि मोईन अली असे दोन फिरकी गोलंदाज आहेत. याची खबरदारी मुंबईच्या फलंदाजांना बाळगावी लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Royal Challengers Bangalore vs Mumbai Indias match Preview in IPL 2019