अमेरिका ते रशिया विमान हाऊसफुल 

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जून 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे आता तासांचे काऊंटडाऊन सुरू झालेले असताना उत्सुकताही कमालीची वाढू लागली आहे. अमेरिकेचा संघ भले या स्पर्धेस पात्र ठरला नसेल; परंतु अमेरिकेकडून रशियाकडे जाणारी विमानं हाऊसफुल होऊ लागली आहेत. विमानांची 66 टक्के बुकिंग वाढली असल्याची आकडेवारी पुढे येत आहे. 

बर्लिन - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे आता तासांचे काऊंटडाऊन सुरू झालेले असताना उत्सुकताही कमालीची वाढू लागली आहे. अमेरिकेचा संघ भले या स्पर्धेस पात्र ठरला नसेल; परंतु अमेरिकेकडून रशियाकडे जाणारी विमानं हाऊसफुल होऊ लागली आहेत. विमानांची 66 टक्के बुकिंग वाढली असल्याची आकडेवारी पुढे येत आहे. 

आपल्या देशाचा संघ खेळत नसला तरी अमेरिकेचे फुटबॉलप्रेमी स्पर्धेचा आनंद घेण्यास रशियात जातीने हजर राहणार आहेत; परंतु वर्ल्ड कपच्या इतिहासात प्रथमच पात्र न ठरलेल्या माजी विजेत्या इटलीच्या प्रेक्षकांनी मात्र पाठ फिरवली आहे. इटलीकडून रशियाकडे जाणाऱ्या विमानांच्या फुटबॉलप्रेमींच्या संख्येत 16 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे, ही आकडेवारी ट्रॅवल टेक्‍नॉलॉजी कंपनी ट्रॅव्हलपोर्टने दिली आहे. 

14 जून ते 15 जुलै या महिनाभरात अमेरिकेतून 1 लाख 36 हजार 503 जणांनी विमानांचे तिकीट आरक्षित केले आहे. नेहमीच्या संख्येपेक्षा 13 हजार 564 आरक्षित तिकिटे अधिक आहेत, अशी माहिती "ग्लोबल ड्रिस्टिबुशन सिस्टिम' यांनी दिली आहे. गतविजेत्या जर्मनीकडून नेहमीच्या तिकिटांच्या तुलनेत 16,213 अधिक बुकिंग झाले आहे. आकडेवारीत ही संख्या 44 टक्के इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
भारताकडूनही अधिक प्रेक्षक जाणार 
यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्र न ठरलेल्या देशांकडूनही रशियात स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या पहिल्या 20 देशांत भारताचाही समावेश आहे. सामने होणाऱ्या स्टेडियममधील साधारणतः 54 टक्के तिकिटे परदेशी प्रेक्षकांसाठी राखीव असतात. यंदा भारतीयांकडून 17, 962 जणांनी विविध सामन्यांची तिकिटे आरक्षित केली आहेत. या स्पर्धेची तिकीट विक्री गेल्या वर्षी सुरू झाली तेव्हा सर्वाधिक तिकिटे आरक्षित करणाऱ्या पहिल्या दहा देशांत भारताचा समावेश होता, अशी माहिती फिफाच्या अधिकाऱ्याने दिली. 

Web Title: russia to usa flight are full