
Sachin Tendulkar Trolled : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या Road Safety World Series 2022 खेळत आहे. तो इंडिया लेजंड्स संघाचे नेतृत्व करतो आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा आपला पहिला सामना जिंकलाय. दरम्यान, सचिन तेंडुलकरला पुन्हा बॅटिंग करताना पाहून फॅन्स आनंदी झाले आहेत. मात्र सचिनने नुकताच इन्स्टाग्रावर एक व्हिडिओ पोस्ट केला त्यावरून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.
सचिन तेंडुलकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत सचिन बॅटची ग्रिप स्वच्छ करायची आपली खास पद्धत चाहत्यांना दाखवत होता. यावेळी त्याने बॅटची ग्रिप साबण लावून कशी स्वच्छ करायची याचे प्रात्यक्षिक देत होता. मात्र अनावधानाने त्याच्याकडून पाण्याचा नळ सुरू राहिला. जोपर्यंत व्हिडिओ सुरू होता तोपर्यंत हा पाण्याचा नळ सुरू होता. यावरून नेटकऱ्यांनी सचिन तेंडूलकरला ट्रोल करण्यास सुरूवात केली.
एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट केली की, 'सर पाणी वाचवा मोहिमेचं काय झालं.' तर एका चाहत्याने ग्रिप स्वच्छ करेपर्यंत पाण्याचा नळ बंद करायचा होता असा खोचक सल्ला देखील दिला.
सचिन तेंडुलकर सध्या Road Safety World Series 2022 स्पर्धेत इंडियन लेजंड्स संघाचे नेतृत्व करत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना हा इंडिया लेजंड्स आणि दक्षिण आफ्रिका लेजंड्स यांच्यात झाला. नेतृत्वातील इंडिया लेजंड्सने हा सामना 61 धावांनी जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर 20 षटकात 4 बाद 217 धावांचे आव्हान ठेवले. स्टुअर्ट बिनीने 24 चेंडूत 82 धावांची तुफानी खेळी केली. दरम्यान, सलामीला आलेल्या सचिन तेंडुलकरने फक्त 16 धावांची योगदान दिले. मात्र या खेळीत देखील त्याने असे काही फटके मारले त्यामुळे चाहत्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.