साईनाचा अखेर विजय

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

चीन स्पर्धेत तिच्याविरुद्ध हरले असले तरी आता तिला हरवू शकेन, हा विश्‍वास होता. या वेळची शटल्सही कमी वेगाने येत होती. त्यामुळे जास्त रॅलीज झाल्या. पूर्ण सामना खेळू शकेन का, असे स्वतःला विचारत होते. गेल्या आठवड्यातील वर्कआउटचा फायदा झाला असणार. 
- साईना नेहवाल

हाँगकाँग - साईना नेहवालने दुबई सुपर ग्रांप्रि अंतिम टप्प्याच्या स्पर्धेस पात्र ठरण्याच्या आशा ठेवताना हाँगकाँग सुपर सिरीज स्पर्धेतील सलामीची लढत जिंकली. साईनाने चीन सुपर सिरीज स्पर्धेतील पहिल्या फेरीतील पराभवाचा बदला घेताना पॉर्नतिप बुरानाप्रासेर्तसुक हिला हरवले.

ऑलिंपिक स्पर्धेच्या सुमारास साईना गुडघा दुखापतीने बेजार होती. त्यानंतर तिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतरची पहिली स्पर्धा खेळताना साईना चीन स्पर्धेत पॉर्नतिपविरुद्ध पराजित झाली होती; मात्र या वेळी साईनाने पहिला गेम गमावल्यानंतर बाजी मारली. तिने ५६ मिनिटे रंगलेली ही लढत १२-२१, २१-१९, २१-१७ अशी जिंकली. यामुळे सिंधू तसेच जपानची सायाको सातो यांच्यासमोरील मार्ग सोपा नसल्याचे साईनाने दाखवले. तिची अन्य प्रतिस्पर्धी जपानची मिनात्सू मितानी पराजित झाली आहे.

शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन सोपे नसते. चार आठवड्यांच्या सरावानंतर स्पर्धा खेळत आहे. मी कितपत तयार आहे, हेच जाणून घ्यायचा माझा प्रयत्न आहे. मी अजून पूर्ण क्षमता साधलेली नाही. अजूनही खूप थकवा जाणवत आहे, असे तिने सांगितले. 

सिंधूचा झटपट विजय
पी. व्ही. सिंधूने जोरदार सुरवात करताना सुसांतिओ युलिया योसेफिन हिच्याविरुद्ध अर्ध्या तासात २१-१३, २१-१६ असा विजय मिळवला. पहिला गेममध्ये सुरवातीच्या चकमकीनंतर आघाडी वाढवलेल्या सिंधूला दुसऱ्या गेममध्ये एकावेळी सलग पाच गुण गमावणे भाग पडले होते. 

इतर भारतीय स्पर्धकांचे निकाल ः 
दुहेरी ः मनू अत्री-बी. सुमित रेड्डी पराभूत विरुद्ध सोलग्यू चोई-को सुंग ह्यून (कोरिया) १५-२१, ८-२१.

एकेरी ः समीर वर्मा विवि ताकुमा युएदा (जपान) २२-२०, २१-१८. एच. एस. प्रणॉय विवि बीन क्वियाओ (चीन) २१-१६, २१-१८. अजय जयराम विवि अँथनी सिनीसुका गिन्टींग (इंडोनेशिया) २१-१५, १३-२१, २१-१६. यान ओ जोर्गेन्सन (डेन्मार्क) विवि बी. साईप्रणित २१-१८, २१-१८

Web Title: Saina finally won