न्यूझीलंड ओपनमधून साईना, प्रणॉयची माघार

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 मे 2018

भारताच्या साईना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय यांनी ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. दोघांना अग्रमानांकन होते. मंगळवारपासून स्पर्धा सुरू होत आहे.

सिडनी - भारताच्या साईना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय यांनी ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. दोघांना अग्रमानांकन होते. मंगळवारपासून स्पर्धा सुरू होत आहे. 

सोमवारी अद्यावत ड्रॉ जाहीर झाला तेव्हा या दोघांसह पी. कश्‍यप याचेही नाव नसल्याचे स्पष्ट झाले. त्याला सहावे मानांकन होते. पुरुष एकेरीत आता द्वितीय मानांकित बी. साईप्रणित आणि चौथा मानांकित समीर वर्मा हेच दोन भारतीय आहेत. 

समीरची न्यूझीलंडच्या अभिनव मानोताशी, तर साईप्रणितची इस्राईलच्या मिशा झिल्बरमन याच्याशी लढत होईल. 

अजय जयरामची पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या प्रतिस्पर्ध्याशी लढत होईल. सौरभ वर्माचा जपानच्या ताकुमा युएदा याच्याशी सामना होईल. 

नवोदीत लक्ष्य सेन याच्यासमोर गतवर्षी न्यूझीलंड ओपन जिंकलेल्या हॉंगकॉंगच्या ली चेऊन यिऊ याचे आव्हान असेल. लक्ष्यने गेल्या आठवड्यात न्यूझीलंड ओपनमध्ये लिन डॅन याच्याविरुद्ध एक गेम जिंकला होता. लक्ष्य-यिऊ यांच्यातील विजयी खेळाडूशी समीरची लढत होऊ शकते. त्यासाठी समीरला विजयी सलामी द्यावी लागेल. 

पुरुष दुहेरीत मनू अत्री-बी. सुमित रेड्डी (तिसरे मानांकन), एम. आर. अर्जुन-श्‍लोक रामचंद्रन (सात) आणि फ्रान्सिस अल्विन-के. नंदगोपाल (8) यांचा सहभाग असेल. 

दृष्टिक्षेपात 
- ही स्पर्धा आधीच्या वर्गवारीनुसार सुपर सीरिज प्रीमियर 
- स्पर्धेची बक्षीस रक्कम सात लाख 50 हजार डॉलर्स 
- जागतिक बॅडमिंटन महासंघाने जाहीर केलेल्या नव्या वर्गवारीनुसार वर्ल्ड टूर सुपर 300 हाच दर्जा 
- बक्षीस रकमेत कपात 
- आता केवळ एक लाख 50 हजार डॉलर्स 
 

Web Title: Saina, Prannoy back from New Zealand Open