परिवारातील सदस्यांच्या खुशालीचा साजनला दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

जाकार्ता : भारताचा जलतरणपटू साजन प्रकाश केरळमधील भयानक पूरस्थिती विसरून आशियाई स्पर्धेत सहभागी झाला खरा, पण त्याला आपल्या परिवारातील सदस्यांची सुरक्षा सतावत होती. कुटुंबातील सदस्य या पुरात हरविले असल्याचे त्याला समजले होते. 

जाकार्ता : भारताचा जलतरणपटू साजन प्रकाश केरळमधील भयानक पूरस्थिती विसरून आशियाई स्पर्धेत सहभागी झाला खरा, पण त्याला आपल्या परिवारातील सदस्यांची सुरक्षा सतावत होती. कुटुंबातील सदस्य या पुरात हरविले असल्याचे त्याला समजले होते. 

मात्र, यानंतरही त्याने 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात अंतिम फेरी गाठण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. त्याचवेळी त्याला आपल्या कुटुंबातील पाच सदस्य पुरात सापडत नसल्याचे समजले. त्यांच्या सुरक्षेसाठी देवाकडे प्रार्थना करून साजन अंतिम फेरीत उतरला. त्याला पदकापासून दूर राहावे लागले. पण, त्याची प्रार्थना देवाने ऐकली. कुटुंबीय सुरक्षित असल्याची बातमी त्याला त्याच्या काकांनी दूरध्वनीवरून दिली आणि त्याचा जीव भांड्यात पडला. 

साजन म्हणाला, "मला परिवारातील सदस्यांच्या सुरक्षेच्या भीतीने झोप लागत नव्हती. त्यांना फोनही करू शकत नव्हतो. फोन केला तरी रेंजची अडचण आल्यामुळे नीटसे ऐकूही येत नव्हते. अशा वेळी काकांचा खुशालीचा फोन आल्याने हायसे वाटले.'' 
साजनच्या कुटुंबीयांनी खरे तर कामगिरीवर परिणाम होईल म्हणून त्याच्यापासून ही बातमी लपवून ठेवली होती. पण, मित्रांकडून त्याला हे वृत्त समजलेच. साजन म्हणाला, "जाकार्ताला आलो तेव्हा केरळमध्ये पाऊस आहे हे समजले होते. पण त्याचे स्वरूप इतके रौद्र असेल असे वाटले नव्हते. जशी केरळच्या पूरस्थितीची माहिती कळू लागली, तसे माझ्यावरील दडपण वाढले होते. तशाच स्थितीत कामगिरीवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला.'' 

आशियाई स्पर्धेत पदक मिळविणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले होते. या वेळी पदकाच्या जवळ पोचूनही दूर राहिलो. पदक जिंकले असते, तर संकटाचा सामना करणाऱ्या कुटुंबीयांसाठी ती मोठी भेट ठरली असती. 
- साजन प्रकाश 

Web Title: Sajan relax after Relief for family members