गटातील दुसऱ्या क्रमांकासह संजयचा मोसमाला लक्षवेधी प्रारंभ 

Sanjay Takle
Sanjay Takle

पुणे : पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने नव्या मोसमाला लक्षवेधी प्रारंभ केला आहे. मलेशियन राष्ट्रीय रॅली मालिकेत पुनरागमन करताना त्याने सर्वाधिक चुरशीच्या आणि आव्हानात्मक गटात दुसरा क्रमांक मिळविला. 

चार फेऱ्यांच्या मालिकेतील पहिली फेरी मलेशियातील पर्लिस प्रांतात शनिवारी-रविवारी पार पडली. संजयने मलेशियाच्या एमआरयू मोटरस्पोर्टस संघाचे प्रतिनिधीत्व केले. मलेशियाचा शॉन ग्रेगरी त्याचा नॅव्हीगेटर होता. त्याने प्रोटॉन सॅट्रीया कार चालविली. त्याने पी9 गटात भाग घेतला. 

संजयने सांगितले की, या गटात सर्वाधक दहा कार होत्या. त्यामुळे चुरस बरीच होती. मोसमाची पहिली फेरी नेहमीच खडतर असते. अशावेळी रॅली पूर्ण केल्याचा आणि त्यात पोडीयम फिनिश केल्याचा मला आनंद वाटतो. पर्लिस हे मलेशियाच्या उत्तरेकडील राज्य आहे. येथील परिसर थोडा वेगळा आहे. नऊ स्टेजमध्ये रॅली होते. एकूण तीन स्टेज असतात. त्या तीन वेळा चालवायच्या असतात. 

संजयने जागतिक रॅली मालिकेच्या तयारीसाठी मोसमाचा पूर्वार्ध राखून ठेवला आहे. त्यामुळे आशिया-पॅसिफीक रॅली मालिकेतील (एपीआरसी) पॅसिफीक विभागातील फेऱ्यांमध्ये त्याने भाग घेतलेला नाही. जागतिक रॅलीसाठी खरेदी केलेली कार सुसज्ज झाल्यानंतर तो वेल्समध्ये ग्रॅहॅम मिडीलटन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार आहे. दरम्यानच्या कालावधीत स्पर्धात्मक सराव व्हावा म्हणून त्याने मलेशियन राष्ट्रीय रॅली मालिकेतील सर्व फेऱ्यांमध्ये भाग घ्यायचे ठरविले आहे. 

संजयने सांगितले की, एपीआरसी मालिकेतील आशिया करंडकाचा टप्पा मलेशियातच सुरू होणार आहे. 2009 पासून मी मलेशियात रॅली करतो आहे. त्यामुळे येथील जवळपास सर्व रॅलींचा मला चांगला अनुभव आहे. एमआरयू मोटरस्पोर्टच्या माध्यमातून महंमद रफीक शंकर उद्या हे चांगल्या सुविधा पुरवितात. येथील रॅलीसाठी प्रोटॉन सॅट्रीया ही रॅली कार मी घेतली आहे. मलेशियाचाच शॉन ग्रेगरी याच्यासह मी अनेक रॅलींमध्ये भाग घेतला आहे. तो अत्यंत व्यावसायिक वृत्तीचा आहे. त्याच्याशी माझा समन्वय चांगला जमला आहे. 2013 मध्ये मी एपीआरसी मालिकेत त्याच्यासह याच संघाकडून; तर 2014 मध्ये कुस्को संघाकडून सहभागी झालो होतो. इतका अनुभव असल्यामुळे आमच्यातील समन्वय उत्तरोत्तर वृद्धिंगत होत गेला. गेली दोन वर्षे मात्र माझा नॅव्हीगेटर वेगळा होता. या ब्रेकनंतरही पुन्हा एकत्र येताना आमच्यात समन्वय जुळून येण्यास फार वेळ लागला नाही. 

शॉनने सांगितले की, गेल्या दोन वर्षांत संजयने कुस्को संघाकडून भाग घेतला. जपानच्या या फॅक्‍टरी टीमकडून तो खूप काही शिकला असून त्याने प्रगती केली आहे. तो आता पेस नोट्‌स जास्त अचूक आणि वेगाने आत्मसात करू शकतो. मुळात संयम आणि शिकण्याची वृत्ती असल्यामुळे त्याला हे शक्‍य होते. त्याचे ड्रायव्हिंग कौशल्यही उंचावले आहे. यामुळे त्याचा आत्मविश्वास उंचावला आहे. 

शनिवारी तीन स्टेज झाल्या. त्या अनुक्रमे आठ, 12 आणि 23 किलोमीटर अंतराच्या होत्या. पाम वृक्षाच्या जोडीला काही ठिकाणी उसाचीही शेते असलेल्या परिसरातून रॅलीचा मार्ग होता. पहिल्या दिवशी संजय-शॉन यांनी दुसरे स्थान मिळविले. 

दरम्यान, माजी विश्वविजेता करमजित सिंग याच्यासाठी निराशाजनक प्रारंभ झाला. त्याची कार तांत्रिक बिघाडामुळे सुसज्जच होऊ शकली नाही. भारताचा मुसा शरीफ त्याचा नॅव्हीगेटर होता. स्पर्धेचा बक्षीस समारंभ पर्लिसच्या युवराजांच्या हस्ते पार पडला. 

पी9 गटाचे निकाल :

  1. अझ्रुल अझहर नोर्बाकारी-तेह यिए सिंग (प्रोटॉन सॅट्रीया- एक तास 48 मिनिटे 09.4 सेकंद)
  2. संजय टकले-शॉन ग्रेगरी (प्रोटॉन सॅट्रीया-1:54.01.2)
  3. मुहंमद हश्रुल जमालुद्दीन-रोझिता तुकिमीन (प्रोटॉन सॅट्रीया-1:58.15.5).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com