संजीवनी जाधवला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

नागपूर -  भारतीय धावपटूंनी भूतानची राजधानी थिम्पू येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना तीन सुवर्णपदकांसह एक रौप्यपदकाची कमाई केली. फॉर्मात असणाऱ्या महाराष्ट्राच्या संजीवनी जाधव आणि प्रदीप चौधरी यांनी वैयक्तिक, तर पुरुष संघाने सांघिक सुवर्णपदक मिळविले. पुरुष विभागात मानने वैयक्तिक रौप्यपदक मिळविले. महिला संघाला सांघिक प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

महिलांच्या आठ किलोमीटर शर्यतीत संजीवनीने सुवर्णपदक जिंकले असले, तरी अन्य सहकाऱ्यांच्या अपयशामुळे महिला संघास सांघिक रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या दहा किलोमीटर शर्यतीत भारताचा प्रदीप चौधरी सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. प्रदीपला अन्य सहकाऱ्यांची सुरेख साथ मिळाली. त्यामुळे पुरुष विभागात भारताला सांघिक सुवर्णपदकाची कमाई करता आली. 

प्रदीप चौधरी, शंकर थापा, अर्जुन कुमार आणि रतीराम सैनीयांचा पुरुष, तर संजीवनी, स्वाती गाढवे, ललिता बाबर आणि जुम्मा खातून यांचा महिला संगात समावेश होता. महिला विभागात सांघिक सुवर्ण श्रीलंकेने जिंकले. पुरुष विभागात भारतीय धावपटूंचे निर्विवाद वर्चस्व राहिले. शंकर मान याने वैयक्तिक रौप्यपदक जिंकले. महिलांत स्वाती गाढवेला पाचवा क्रमांक मिळाला. यात नेपाळच्या धावपटूने रौप्य, तर श्रीलंकेच्या धावपटूने ब्राँझपदक जिंकले. 

ही स्पर्धा फक्त पुरुष व महिलांसाठी होती. त्यात दक्षिण आशियातील भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, भूतान, बांगलादेश आणि मालदीवचे संघ सहभागी झाले होते. त्यातही भारताला निर्विवाद वर्चस्व गाजविता आले नाही. विजेंदरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या संजीवनीने पंधरा दिवसांपूर्वी चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले होते. विजेंदरसिंग हे भूतानच्या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. 

निकाल 
 पुरुष (१० किमी.) - प्रदीप सिंग चौधरी (भारत-३३ मि.५२.२० सेकंद), शंकर मान थापा (भारत - ३४ मि.०१.६४ सेकंद), डॉन लिओनल (श्रीलंका - ३४ मि.१५.४७ सेकंद), सांघिक - भारत, श्रीलंका, भुतान.   महिला (८ कि.मी.) - संजीवनी जाधव (भारत - ३२ मि.००.६४ सेकंद), बिश्‍वरुपा (नेपाळ - ३२ मि.१८.४७ सेकंद), उदा रत्नायका (श्रीलंका - ३२ मि.२८.७५ सेकंद), सांघिक - श्रीलंका, भारत, नेपाळ.

Web Title: Sanjivani Jadhav Gold medal nagpur