सिरी-ए फुटबॉल लीग : क्रोटोनवर विजयासह इंटर मिलान क्रमवारीत पहिल्या स्थानावर

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 3 January 2021

सिरी-ए फुटबॉल लीग स्पर्धेत इंटर मिलानने क्रोटोन संघावर दमदार विजय मिळवलेला आहे. आणि या विजयासह इंटर मिलान संघाने क्रमवारीतील पहिले स्थान काबीज केले आहे.

सिरी-ए फुटबॉल लीग स्पर्धेत इंटर मिलानने क्रोटोन संघावर दमदार विजय मिळवलेला आहे. आणि या विजयासह इंटर मिलान संघाने क्रमवारीतील पहिले स्थान काबीज केले आहे. इंटर मिलान आणि क्रोटोन यांच्यात आज झालेल्या सामन्यात इंटर मिलानने क्रोटोनचा 6 - 2 असा पराभव केला. तसेच ही लढत जिंकत इंटर मिलान संघाने आपला अकरावा विजय मिळवला आहे.        

क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या

इंटर मिलान आणि क्रोटोन यांच्यात झालेल्या सामन्यात, क्रोटोन संघाच्या निक्कोलोने खेळाच्या 12 व्या मिनिटालाच गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र त्यानंतर क्रोटोनच्या संघाला ही आघाडी टिकवता आली नाही. इंटर मिलान संघातील मार्टीन्झने आपला पहिला गोल 20 व्या मिनिटाला करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर इंटर मिलानच्या लुकाने 31 व्या मिनिटाला गोल करत संघाला 2 - 1 अशी बढत मिळवून दिली. परंतु इंटर मिलानला देखील ही बढत टिकवता आली नाही. क्रोटोनच्या व्लामदीरने 36 व्या मिनिटाला गोल केल्याने पुन्हा सामन्यात 2 - 2 अशी बरोबरी झाली. 

पण त्यानंतर, इंटर मिलानकडून गोलचा धडाकाच पाहायला मिळाला. इंटर मिलान संघाच्या मार्टीन्झने आपला दुसरा गोल 57 व्या मिनिटाला करून संघाला पुन्हा 3 - 2 ने बढत घेऊन दिली. त्यानंतर रोमेलू लुकाकूने याच्या सातव्या मिनिटानंतर गोल करत इंटर मिलानला पुन्हा एक गोल मिळवून दिला. याच्यानंतर 78 व्या मिनिटाला मार्टीन्झने सामन्यातील आपला तिसरा गोल केला. तर हकीमीने 87 व्या मिनिटाला गोल करून इंटर मिलानला 6 - 2 अशी बढत घेऊन दिली. त्यामुळे या सामन्यात इंटर मिलानने क्रोटोनवर 6 - 2 ने विजय मिळवला.  

दरम्यान, सिरी-ए फुटबॉल क्रमवारीत इंटर मिलानच्या संघाने 15 पैकी 11 सामन्यांमध्ये विजय मिळवत 36 अंकांसह पहिले स्थान गाठले आहे. त्यानंतर मिलानचा  संघ दुसऱ्या स्थानी घसरला आहे. मिलान संघाने 14 पैकी 10 सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. त्यामुळे त्यांचे 34 अंक आहेत. यानंतर 30 अंकांसह रोमाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर 28 अंकांसह नापोली चौथ्या व 26 अंकांसह सोसूलोचा संघ पाचव्या नंबरवर आहे.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Serie A football league Inter Milan tops the rankings with a win over Croton