esakal | विराट आणि टीम इंडिया "ऑन ड्युटी 24 तास' 

बोलून बातमी शोधा

विराट आणि टीम इंडिया "ऑन ड्युटी 24 तास' 

क्रिकेटचे सामने, त्यासाठी केलेला सराव आणि प्रवास असे वर्षातील 365 दिवसांतील जवळपास 300 दिवस व्यस्त असतो... टीम इंडियाचा आणि क्रिकेटविश्‍वातील सर्वात नावाजलेल्या विराट कोहलीने व्यक्त केलेले मत (व्यथा) गांभीर्याने घेण्यासारखे आहे. 

विराट आणि टीम इंडिया "ऑन ड्युटी 24 तास' 
sakal_logo
By
शैलेश नागवेकर

भारतीय क्रिकेट संघाचे हे सध्या असे सुरू आहे. एक सामना झाला की लगेचच दुसरा. एक मालिका संपत नाही तोच दुसरी मालिका, आत्ता तर हे नित्याचे झाले आहे. त्यामुळे खेळाडू आता तक्रार करत नाहीत, केवळ सत्य परिस्थिती अधूनमधून व्यक्त करत असतात. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आदल्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कोहलीने मोठे विधान केले. कोणीतरी त्याला प्रश्‍न विचारला, पुढील तीन वर्षे तरी आपण तिन्ही प्रकारांत खेळणार असल्याचे तो म्हणाला आणि त्याचवेळी त्याने वर्षभराची ही आकडेवारीही सादर केली. लोकप्रियता-प्रसिद्धी-पैसा असा सध्याच्या व्यस्त क्रिकेटपटूंचा त्रिकोण आहे. त्यामुळे "ऑन ड्युटी 24 तास' यातून सुटका नाही, हे खरे आहे. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

अचूक नियोजनाचा उपाय 
भारतीय क्रिकेट मंडळ अर्थात बीसीसीआय क्रिकेट विश्‍वातील सर्वाधिक श्रीमंत संस्था. भारतीय संघ जेवढे जास्त सामने खेळेल आणि वर्चस्व गाजवेल तेवढा पैशांचा ओघ कायम राहातो. पर्यायाने खेळाडूंचेही भले होते. बीसीसीआयकडून तेही मालामाल होत असतात. विराटसारख्या अव्वल खेळाडूला तर कोटींचा करार मिळतो. हे झाले बीसीसीआयकडून मिळणारे उत्पन्न. विराटचे वैयक्तिक प्रायोजक वेगळे, म्हणूनच क्रीडा विश्‍वातील श्रीमंत खेळाडूंच्या यादीत विराट वरच्या स्थानी आहे. जेवढे खेळत राहणार तेवढी प्रसिद्धी आणि पैशांची गंगा ओसंडून भरून वाहत राहणार. अचूक नियोजन हाच यातून एकमेव मार्ग आहे, पण सध्या त्यातही सामन्यांची आणि मालिकांची भाऊगर्दी झाली आहे, इतकी की दिवसा आपल्या देशात आणि रात्र होताच परदेशात. यासाठी ताजे उदाहरण आहे. मायदेशातील ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका रविवारी संपली, तेथून लगेचच पुढच्या दिवशी न्यूझीलंडचा प्रवास आणि बुधवारी पहिला सामना. हे म्हणजे अतिच झाले. भारत आणि न्यूझीलंडच्या प्रमाण वेळेत 7.30 तासांचा फरक आहे, म्हणजे भारतात झोपण्याच्या वेळेत न्यूझीलंडमध्ये पहाट होते. हे गणित एक-दोन दिवसांत कसे जुळणार, तरीही आपले खेळाडू सज्ज होते आणि ट्‌वेंटी-20 मालिकाही जिंकले. 

दोन मालिकांत वेळ हवा 
रवी शास्त्री यांनी मुख्य प्रशिक्षकाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अशाच एका व्यस्त दौऱ्यानंतर दोन मालिकांमध्ये पुरेसा वेळ असावा, अशी उघड मागणी केली. विराट कोहलीनेही त्यास समर्थन दिले. पुढील कार्यक्रम निश्‍चित करताना आम्ही निश्‍चितच याचा विचार करू, असे आश्‍वासन त्या वेळी प्रशासकीय सूत्रे असलेल्या प्रशासकीय समितीने दिले होते; पण येरे माझ्या मागल्या. फार लांब नको, जवळचाच विचार करू या. 
जुलै महिन्यात विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजमध्ये मालिका, मायदेशात दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळलाय; आता न्यूझीलंडमध्ये पूर्ण मालिका खेळतोय. तेथून परतल्यावर मायदेशात पुन्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि मग लगेचच आयपीएल! यातील काही मालिका तीन-तीन सामन्यांच्या होत्या, हे खरे असले तरी येणाऱ्या शारीरिक ताणापेक्षा मानसिक ताण थकवणारा असतो. कोणाविरुद्ध खेळतोय हे समजायच्या आत दुसऱ्या संघाविरुद्ध खेळण्यास सज्ज व्हायचे. या सातत्यपूर्ण मालिकांमध्ये श्रीलंकेच्या ठिकाणी झिम्बाब्वेची मालिका होणार होती, पण त्यांच्यावर त्या वेळी बंदी असल्यामुळे हा कालावधी रिकामा जाणार होता, पण बीसीसीआयने श्रीलंकेला निमंत्रण दिले. 

दुखापती कधी बऱ्या होणार? 
दोन मालिकांमधील विश्रांती ही एक तर मानसिकदृष्ट्या चार्ज होण्यासाठी असतेच, पण छोट्या-छोट्या दुखापती बऱ्या होण्यासही उपयोगी ठरत असते. या छोट्या-छोट्या दुखापतींना वेळीच विश्रांती मिळाली नाही तर पुढे जाऊन त्या गंभीर होतात आणि मग सक्तीची विश्रांती घ्यावी लागेल. अगोदर जसप्रीत बुमरा आणि आता हार्दिक पंड्याला याचा सामना करावा लागत आहे. पंड्या तर अजून तंदुरुस्त झालेला नाही. 

इतर खेळांत काय होते 
आता आपण क्रिकेटचा विचार करतोय, पण भूतलावरील सर्वात लोकप्रिय खेळ फुटबॉल. त्यानंतर टेनिस, अशा खेळांचा विचार केला तर त्यांचाही कार्यक्रम व्यस्त असतो. फुटबॉल तर वर्षभर सुरू असतो. व्यावसायिक लीग, देशांचे मित्रत्वाचे सामने, चॅंपियन्स लीग दर दोन वर्षांनी वर्ल्डकप किंवा युरो/कोपा अमेरिका किंवा त्याच्या पात्रता स्पर्धा असे सामने सुरूच असतात. चॅंपियन्स लीगच्या अंतिम सामन्यानंतर साधारतः मे महिन्यात फुटबॉल कार्यक्रमाची सांगता होते. पण एका महिन्यानंतर पुन्हा ती सुरू होते. लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यासारख्या दिग्गजांना हे वर्तुळ पूर्ण करावे लागते. 

पी. व्ही. सिंधू, साईनावरही परिणाम 
अगोदर साईना नेहवाल आणि आता पी. व्ही. सिंधू यांनी यशाच्या शिखरावर जसजसे मार्गक्रमण केले तसतसे त्यांचा भाव वाढला. प्रायोजकांच्या दुनियेत किंमतही वाढली. त्यामुळे मागणी वाढत गेली. आता त्यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या असताना सातत्याने खेळण्याचीही मागणी आणि गरज वाढली आहे. परिणामी त्यांच्याकडूनही सातत्याने खेळण्याचा तंदुरुस्तीवर परिणाम होत असल्याचे जाहीर केले जाऊ लागले. मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद यांनाही निवडक स्पर्धांचा सल्ला द्यावा लागला.