नेमबाजीत कोरोनाचा धोका सर्वात कमी; मग स्पर्धा घेण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही...!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

नेमबाजी हा कमालीचा सुरक्षित खेळ आहे. त्यामुळे या खेळाचा सराव सुरू करण्यास, स्पर्धा घेण्यास फारसे प्रश्न येणार नाहीत.

मुंबई ः नेमबाजी हा कमालीचा सुरक्षित खेळ आहे. त्यामुळे या खेळाचा सराव सुरू करण्यास, स्पर्धा घेण्यास फारसे प्रश्न येणार नाहीत. त्यानंतरही जास्त खबरदारी कशा प्रकारे घेता येईल, याची चर्चा आम्ही काही दिवसांत करणार आहोत, असे राज्य नेमबाजी संघटनेच्या सचिव शीला कानुन्गो यांनी सांगितले. नेमबाजांचे साहित्य वैयक्तिक असते, तसेच हा खेळही पूर्ण वैयक्तिक आहे. त्यामुळे त्याच्यात फारसे उपाय करण्याची मला तरी आवश्‍यकता भासत नाही, असेही त्यांनी सांगितले. 

वाचा ः लॉकडाऊनचा असाही फायदा; दिवा लेव्हल क्रॉसिंगचे काम दोन आठवड्यात पूर्ण

केंद्रीय क्रीडा खात्याने स्टेडियममधील सरावास परवानगी दिली असली, तरी अद्याप मोठ्या प्रमाणावर सराव सुरू झालेला नाही. नेमबाजी हा कोणत्याही प्रकारे एकमेकांशी संपर्क नसलेला खेळ आहे. त्यामुळे तो सुरु करण्यात फारसे प्रश्नही येणार नाहीत. मुळात नेमबाज सराव करतात किंवा लक्ष्य साधतात, त्या वेळी त्यांच्यात एक मीटरचे अंतर असते. आता हा खेळ जास्त सुरक्षित करण्यासाठी प्रसंगी एक लेन सोडून नेमबाज लक्ष्यवेध करू शकतील. आता नेमबाजांचे सर्व साहित्य पूर्णपणे वैयक्तिक असते. त्यामुळे त्याचा एकमेकांशी संपर्क येण्याचा प्रश्नच येत नाही. आता सरावाचे किंवा स्पर्धेचे ठिकाण समान असेल, पण तो भाग निर्जंतुक करण्याबाबत विचार करता येईल, असे त्यांनी सांगितले. 

वाचा ः नवी मुंबईत अत्याधुनिक कोरोना रुग्णालय; वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रातील काम अंतिम टप्प्यात

नेमबाजी दोन प्रकारच्या रेंजवर होते. काही रेंज खुल्या असतात, तर काही बंदिस्त. बंदिस्त रेंज निर्जंतुक कराव्या लागतील, खुल्या रेंज निर्जंतुक करण्याची मला तरी गरज भासत नाही. आपण रस्त्यावरून फिरत असतो, ते काही निर्जंतुक नसतात. बंदिस्त रेंजबाबत नक्कीच विचार करू, त्याही कधी करता येतील, याबाबत चर्चा करणार आहोत. नेमबाजी ही काही मास्क घालून नक्कीच करता येणार नाही. नेमबाजांना एकाग्रता साधण्यासाठी श्वास रोखून ठेवण्याचे आव्हान असते. त्यामुळे मास्क घातल्यास नेमबाजीवर परिणाम होईल. त्याचबरोबर स्पर्धकांत सुरक्षित अंतरही आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. नेमबाज सराव करताना किंवा स्पर्धा करताना एकमेकांशी बोलत नाहीत. त्यामुळे मास्क आवश्‍यक असावा, असे मला तरी वाटत नाही. मात्र सरावास सुरुवात करण्यापूर्वी तसेच संपल्यानंतर मास्क सक्तीचा करण्याबाबत नक्कीच विचार करता येईल, असे त्यांनी सांगितले. 

वाचा ः अधिकार नसलेल्या अधिकाऱ्याने काढलेले परिपत्रक रद्द करा; इंटकची मागणी

राष्ट्रीय शिबिरास जुलैपासून सुरुवात? 
भारतीय नेमबाजांचे राष्ट्रीय शिबिर जुलैपासून सुरू करण्याचा भारतीय संघटनेचा विचार असल्याचे संघटनेचे सचिव राजीव भाटिया यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी जिल्हा तसेच राज्य स्तरावरील सराव त्याच सुमारास सुरू व्हावा, ही अपेक्षा व्यक्त केली; मात्र त्याच वेळी स्थानिक परिस्थितीवर सर्व काही अवलंबून असेल, असेही त्यांनी सांगितले. आता मुंबई, पुण्यात कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत. या परिस्थितीत तिथे स्पर्धा कशा सुरू होऊ शकतील? सरावाबाबतही प्रश्नच असेल; तर ईशान्य राज्यांत हा प्रश्न गंभीर नाही. त्यामुळे आम्ही देशभरात एकच धोरण अंमलात आणणार नाही, असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shooting is very secured game, we have to try for matches, say state shooting federation