फोर्ब्सच्या श्रीमंत खेळाडूंत सिंधूला स्थान

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

जगातील सर्वात श्रीमंत महिला क्रीडापटूत पी. व्ही. सिंधूने स्थान मिळवले आहे. या क्रमवारीत पहिल्या अकरा महिला क्रीडापटू या टेनिसपटू आहेत. त्यानंतर असलेली सिंधू संयुक्त तेरावी आहे.

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत महिला क्रीडापटूत पी. व्ही. सिंधूने स्थान मिळवले आहे. या क्रमवारीत पहिल्या अकरा महिला क्रीडापटू या टेनिसपटू आहेत. त्यानंतर असलेली सिंधू संयुक्त तेरावी आहे.

सेरेना विल्यम्स अव्वल असलेल्या या यादीनुसार सिंधूची कमाई 55 लाख डॉलर म्हणजेच सुमारे 38 कोटी 98 लाख 91 हजार रुपये आहे. "सिंधू भारतातील सर्वाधिक लोकप्रिय क्रीडापटू आहे. तिच्यावर मार्केटचा सर्वाधिक भरवसा आहे. बीडब्लूएफ वर्ल्ड टूर फायनल्स जिंकलेली ती पहिली भारतीय आहे, असे फोर्ब्स्‌ने म्हटले आहे.

सेरेना विल्यम्स कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे; पण तिचीच 2 कोटी 92 लाख डॉलरची कमाई महिला क्रीडापटूत सर्वाधिक आहे. तिचा एस फॉर सेरेना हा कपड्यांचा ब्रॅंड लवकरच येईल; तसेच ती दागिने आणि सौंदर्य उत्पादनांनाही सुरुवात करणार आहे. तिची खेळातील कमाई केवळ 42 लाख डॉलरच आहे. या क्रमवारीत दुसरा क्रमांक मिळवताना नाओमी ओसाका हिने दोन कोटीचा टप्पा पार केलेली चौथी महिला खेळाडू होण्याचा मान मिळवला.

टेनिसपटू नसतानाही या क्रमवारीत केवळ ऍलेक्‍स मॉर्गन (फुटबॉल), पी. व्ही. सिंधू आणि ऍरिया जुतानागार्न (गोल्फ) आहेत. आघाडीवरील पंधरा महिला क्रीडापटूंची एकत्रित कमाई 14 कोटी 60 लाख डॉलर आहे. हीच कमाई गतवर्षी 13 कोटी डॉलर होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sindhu in forbes richest sportswomen list