
GGW vs RCBW : स्मृतीच्या आरसीबीची पराभवाची हॅट्ट्रिक; अदानींच्या गुजरातने उघडले विजयाचे खाते
Women's Premier League GGW vs RCBW : वुमन्स प्रीमियर लीगच्या 6 व्या सामन्यात गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर बेंगलोरविरूद्ध विजयासाठी 202 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हे आव्हान राजस्थानला पेलवले नाही. त्यांना 20 षटकात 6 बाद 190 धावांपर्यंतच मजल मारता आली.
आरसीबीकडून सलामीवीर सोफी डिवाईननने 66 धावांची तर हेथर नाईटने 11 चेंडूत नाबाद 30 धावा करत जोरदार लढत दिली. मात्र ही लढत 11 धावांनी कमी पडली. अखेर गुजरातने सलग दोन पराभवानंतर विजयाचे खाते उघडले. तर स्मृती मानधनाच्या तगड्या आरसीबीला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली. गुजरातच्या अॅश्लेघ गार्डनरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्.ा.

गुजरात जायंट्सने विजयासाठी ठेवलेल्या 202 धावांचा पाठलाग करताना आरसीबीची सलामी जोडी सोफी डिवाईन आणि स्मृती मानधना यांनी दमदार सुरूवात केली. यात सोफी डिवाईनचा मोठा वाटा होता. तर स्मृती मानधना तिला चांगली साथ देत होती. या दोघांनी 5.2 षटकात 54 धावांची अर्धशतकी सलामी दिली. मात्र अॅश्लेघ गार्डनरने ही जोडी फोडली. तिने आपली फेव्हरेट शिकार स्मृती मानधनाला 18 धावांवर बाद केले.
यानंतर सोफीने एलिस पेरीसोबत भागीदारी रचत आरसीबीला शंभरीच्या जवळ पोहचवले. मात्र मानसी जोशीने पेरीला 32 धावांवर बाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला. यानंतर रिचा घोष देखील 10 धावा करून गार्डनरची शिकार झाली. आरसीबीचा धावगती मंदावू लागली दरम्यान, अर्धशतक पार केलेल्या सोफीने हेथर नाईट सोबत आक्रमक फटकेबाजी करण्यात सुरूवात केली. मात्र सदरलँडने 45 चेंडूत 66 धावांची खेळी करणाऱ्या सोफी डिवाईनला बाद करत आरसीबीला चौथा धक्का दिला.
सोफी बाद झाली त्यावेळी 17 वे षटक सुरू होते. मात्र हेथर नाईटने तुफान फटकेबाजी करत सामना 18 चेंडूत 44 धावा असा आणला. मात्र गार्डनर पुन्हा एकदा गुजरातच्या मदतीला धावून आली. तिने कनिका अहुजाला 10 धावांवर बाद केले. त्यानंतर सामना 9 चेंडूत 32 धावा असा आला. हेथर नाईटने सामना 6 चेंडूत 24 धावा असा आणला.
मात्र दुसऱ्या बाजूने तिला साथ देण्यारे फलंदात बाद होत राहिले. श्रीयांका पाटीलने सामना 3 चेंडूत 22 धावा असा आला असताना एक षटकार एक चौकार मारत सामना 1 चेंडूत 12 धावा असा आणला. मात्र सदरलँडने पुढचा चेंडू निर्धाव टाकत सामना 11 धावांनी जिंकून दिला. हेथरने 11 चेंडूत नाबाद 30 धावा ठोकल्या.
तत्पूर्वी, वुमन्स प्रीमियर लीगच्या (Women's Premier League) पहिल्या दोन सामन्यात पराभव पदरी पडलेल्या गुजरात जायंट्सने आपल्या तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय गुजरातची सलामीवीर सोफिया डंक्लेने सार्थ ठरवत दमदार सुरूवात करून दिली. सोफिया डंक्लेच्या 65 तर हरलीन देओलच्या 67 धावांच्या जोरावर गुजरातने 20 षटकात 6 बाद 201 धावा केल्या.
हेही वाचा : परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर