INDvsBAN : दिल्लीतील ट्वेंटी20 होणार का?; गांगुलींनी दिला मोठा निर्णय 

वृत्तसंस्था
Thursday, 31 October 2019

दिल्लीतील हवेच्या दर्जाचा निर्देशांक 400च्या वर गेला आहे. त्यामुळे येथे सामना होणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी हा सामना दिल्लीलाच होणार असे स्पष्ट केले आहे. 

नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहला ट्वेंटी20 सामना अत्यंत खराब कारणांमुळे चर्चेत आहे. दिल्लीतील वाढते प्रदूषण ही या सामन्यासाठी मोठी अडचण ठरत आहे. या वातावरणात खेळण्याचा खेळाडूंवर नक्कीच विपरीत परिणाम होऊ शकतो. दिल्लीतील हवेच्या दर्जाचा निर्देशांक 400च्या वर गेला आहे. त्यामुळे येथे सामना होणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी हा सामना दिल्लीलाच होणार असे स्पष्ट केले आहे. 

मी वेडा होतोय, प्लिज मला क्रिकेटपासून लांब राहुद्या!

दोन वर्षांपूर्वी डिसेंबरमध्ये भारत-श्रीलंका कसोटी झाली होती. त्या वेळी श्रीलंका खेळाडूंना श्‍वास घेणेही कठीण झाले होते. ते मास्क घालून खेळले तरीही आजारी पडले होते. आता या परिस्थितीत दिवाळीनंतर लगेचच दिल्लीत होणाऱ्या लढतीच्या वेळी हवा कमालीची प्रदूषित असेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

भारतीय मंडळास दिल्लीतील प्रदूषणाची पुरेपूर कल्पना आहे. मात्र रोटेशन पद्धतीनुसारच सामन्यांची ठिकाणे ठरवली जातात. त्यानुसार दिल्लीची निवड झाली आहे. त्यातच बांगलादेश संघाच्या प्रवास कार्यक्रमामुळे पहिला सामना दिल्लीत होत आहे. मात्र प्रदूषणाचा स्तर रात्री कमी होतो, असे सांगितले जात आहे. अर्थात उपलब्ध आकडेवारीनुसार दिल्ली विद्यापीठाच्या परिसरात हवेतील गुणवत्तेचा निर्देशांक 357 होता. हा खूपच खराब आहे.

Video : चेंडूच तो! 147 किमी वेगाने आलेला, थेट मैदानाबाहेर भिरकावला

असे असले तरी पहिला ट्वेंटी20 सामना दिल्लीतच होणार आहे असे गांगुलींनी स्पष्ट केले आहे.दिल्लीच्या हवेतील प्रदूषणावर आमचे नियंत्रण नाही, हे भारतीय मंडळाचे; तसेच दिल्ली संघटनेचे पदाधिकारी खासगीत मान्य करतात. दिवाळीनंतर एका आठवड्याने लढत आहे आणि रात्री प्रदूषण कमी होते. त्यामुळे प्रदूषणाचा त्रास जास्त होणार नाही, अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. बांगलादेश संघाचे दिल्लीत आगमन होईल आणि ते कोलकत्त्याहून मायदेशी प्रयाण करतील हे ठरल्यावरच दौऱ्याचा कार्यक्रम ठरला.

बांगलादेश संघाला मास्क आणण्याची सूचना?
दिल्लीतील प्रदूषणाची पूर्ण जाणीव असल्यामुळे बांगलादेश संघातील खेळाडूंना मास्क घेऊन येण्याची सूचना देण्यात आली आहे. अर्थात दिल्ली सरकारने यापूर्वीच पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांना 26 ऑक्‍टोबर ते 4 नोव्हेंबरदरम्यान राब न जाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर दिवाळी संपूनही चार दिवस झाले असतील, त्यामुळे लढतीच्या वेळी प्रदूषणाचा त्रास होणार नाही, अशी अपेक्षा दिल्ली संघटना पदाधिकारी बाळगून आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sourav Ganguly Confirms The Fate Of Delhi T20I Between India And Bangladesh