SLvsRSA: लंकेच्या 35 धावांत 6 विकेट; दक्षिण आफ्रिकेसमोर ओढावली व्हाईट वॉशची नामुष्की

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 5 January 2021

दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दमदार खेळी करत विजय मिळवलेला आहे.

दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दमदार खेळी करत विजय मिळवलेला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने श्रीलंकेवर 10 गडी राखून मोठा विजय मिळविला. श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात 211 धावांवर सर्वबाद झाला. आणि त्यामुळे सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेने 67 धावांचे लक्ष्य गाठत दोन सामन्यांची कसोटी मालिका आपल्या खिशात घातली. 

दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेने 150 धावांवर चार गडी गमावल्यानंतर पुढे खेळण्यास सुरवात केली. मात्र त्यानंतर श्रीलंकेचा संघ 211 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना सलामीवीर दिमुथ करुणारत्ने याने सर्वाधिक 103 धावा केल्या. त्याने 128 चेंडूंचा सामना करत 19 चौकारांसह शतकीय खेळी साकारली. मात्र ही खेळी अपुरी पडल्याचे पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेला सामन्यात विजय मिळवण्यासाठी 67 धावांचे लक्ष्य मिळाले होते. आणि दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गर आणि एडन मक्रम या दोघांनी हे टार्गेट सहजरित्या गाठत संघाला विजय मिळवून दिला. 

क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या

तत्पूर्वी, दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय संघाला चांगलाच महागात पडल्याचे दिसले. कारण पहिल्या डावात श्रीलंकेचा संघ अवघ्या 157 धावांवर बाद झाला. यावेळेस दक्षिण आफ्रिकेकडून सगळ्यात जास्त विकेट्स नॉर्टीजेने घेतल्या. त्याने 56 धावा देत 6 बळी टिपले. त्याबदल्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना 302 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गरने पहिल्या डावात शतकी खेळी केली. त्याने 163 चेंडूंचा सामना करताना 127 धावा केल्या. 

यानंतर, दुसऱ्या डावात फलंदाजीस उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाला एनगिडीने चांगलेच धक्के दिले. त्याने 44 धावा देताना श्रीलंकेच्या चार फलंदाजांना माघारी धाडले. तर लुथो सिम्पलाने तीन बळी टिपले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकले आहेत. व श्रीलंकेच्या संघाला व्हाईट वॉश दिला आहे. याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 120 अंक मिळवले आहेत.      


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: South Africas whitewash of Sri Lanka in Tests