पहिल्याच दिवशी भारताला 11 सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

दक्षिण आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या दुर्गा देवरेचे सोनेरी यश, चैत्रालीला रौप्य
नागपूर - कोलंबोच्या सुगतदासा स्टेडियमवर सुरू झालेल्या तिसऱ्या दक्षिण आशियाई ज्युनिअर ॲथलेटिक्‍स स्पर्धेच्या पहिल्या दिवशी शनिवारी भारताने ११ सुवर्णपदकांसह अपेक्षित वर्चस्व गाजविले. भारताच्या यशात महाराष्ट्राच्या मुलींनीही एकूण चार पदकांचे योगदान दिले. त्यात दुर्गा देवरेचे सुवर्ण आणि चैत्राली गुजरच्या रौप्यपदकाचा समावेश आहे. 

दोनदिवसीय स्पर्धेत भारताच्या वर्चस्वाला रोखण्यासाठी यजमान श्रीलंकेने ८२ खेळाडूंचे पथक उतरविले. तरीही त्यांना ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि ११ ब्राँझपदकेच मिळविता आली. भारताने ११ सुवर्ण, १० रौप्य आणि ३ ब्राँझपदके जिंकली. भारताने ५९ खेळाडू उतरविले आहेत. दुर्गा देवरे आणि पूनम सोनुने यांच्यात पंधराशे मीटर शर्यतीत सुवर्णपदकासाठी चुरस होती. मात्र यात अनुभवी दुर्गाने बाजी मारली. तिने ४ मिनिटे ३१.३८ सेकंदात शर्यत पूर्ण करताना पी. यू. चित्राने २०१३ मध्ये केलेला ४ मिनिटे ३२.१३ सेकंदाचा स्पर्धा विक्रम मोडीत काढला. दुर्गाची सरावातील सहकारी पूनम सोनुनेला ४ मिनिटे ३६.६५ सेकंदात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

दक्षिण आशियाई स्पर्धेत वेगवान धावपटूचा किताब जिंकण्याचे साताराच्या चैत्राली गुजरचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. सुवर्णपदक विजेत्या श्रीलंकेच्या अमशा डिसिल्वाचे आव्हान चैत्रालीला पेलविले नाही. तिला १२.२४ सेकंदात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चैत्रालीने दुसरे रौप्यपदक ४-१०० मीटर रिले शर्यतीत जिंकले. रिले संघात पुण्याच्या सिद्धी हिरे हिचाही समावेश होता. 

भारताचे इतर सुवर्णपदक विजेते -
मुले - अर्शदीप सिंग (भालाफेक), अजय (थाळीफेक), लोकेश सत्यनारायण (लांब उडी), कुणाल चौधरी (११० हर्डल्स), प्रज्वल रवी (१०० मीटर), अंकित (१५०० मीटर), ४-१०० मीटर रिले. मुली - पुनिता रामास्वामी (लांब उडी), किरण बलियान (गोळाफेक), सपना कुमारी (१०० हर्डल्स).

Web Title: south asia athletics competition