
New T20 Record : १० धावांवरच खेळ खल्लास! टी-२० क्रिकेट मध्ये अनोखा रेकॉर्ड
New T20 Record : टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नीचांकी धावसंख्या सोमवारी नोंदवली गेली. स्पेन क्रिकेट संघाने ‘आईल ऑफ मॅन’ या संघाचा १० धावांवरच खेळ खल्लास केला. अवघ्या दोन चेंडूंमध्येच स्पेनने विजय साकारत सहा सामन्यांची मालिका ५-० अशी खिशात घातली. अतीफ मेहमूद याने ६ धावांवर चार मोहरे टिपत सामनावीराचा मान मिळवला.
स्पेनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. ‘आईल ऑफ मॅन’च्या सर्व फलंदाजांना एकेरीच धावसंख्या करता आली. सहा फलंदाज शून्यावरच बाद झाले. जोसेफ ब्यूरोस याने सर्वाधिक ४ धावा केल्या. स्पेनकडून मोहम्मद कामरान व अतीफ मेहमूद यांनी प्रत्येकी चार फलंदाज बाद केले.
टी-२० मधील नीचांक
१) आईल ऑफ मॅन - १० धावा (विरुद्ध स्पेन, २०२३)
२) तुर्की - २१ धावा (विरुद्ध झेक प्रजासत्ताक, २०१९)
३) लेसोथो - २६ धावा (विरुद्ध युगांडा, २०२१)
‘आईल ऑफ मॅन’ कुठे?
‘आईल ऑफ मॅन’ या नावाचा देश युरोप खंडात आहे. आयर्लंड व ग्रेट ब्रिटन या दोन देशांमध्ये असलेल्या ठिकाणाला ‘आईल ऑफ मॅन’ असे म्हटले जात आहे. या देशाची राजधानी ‘डगलस’ आहे.
संक्षिप्त धावफलक : आईल ऑफ मॅन ८.४ षटकांत सर्वबाद १० धावा पराभूत वि. स्पेन ०.२ चेंडूंमध्ये १३ धावा.