प्रणॉयचा जेतेपदाचा दुष्काळ संपला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

अमेरिकन ओपन ग्रां. प्रि. स्पर्धेत सहकारी कश्‍यपचे आव्हान परतवले

मुंबई - हसीना सुनीलकुमार प्रणॉयने अखेर विजेतेपदांचा दुष्काळ संपवला. त्याने अमेरिकन ओपन ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकताना त्याचाच सरावातील सहकारी पारुपली कश्‍यपला तीन गेमच्या रंगतदार लढतीत पराजित केले. 

अमेरिकन ओपन ग्रां. प्रि. स्पर्धेत सहकारी कश्‍यपचे आव्हान परतवले

मुंबई - हसीना सुनीलकुमार प्रणॉयने अखेर विजेतेपदांचा दुष्काळ संपवला. त्याने अमेरिकन ओपन ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकताना त्याचाच सरावातील सहकारी पारुपली कश्‍यपला तीन गेमच्या रंगतदार लढतीत पराजित केले. 

ॲनाहेईम (कॅलिफोर्निया) येथे झालेल्या या स्पर्धेतील निर्णायक लढतीत प्रणॉयने २१-१५, २०-२२, २१-१२ असा विजय मिळवताना शटलवर जबरदस्त नियंत्रण राखले. त्याने तंदुरुस्तीतही आपण खूपच वरचढ आहोत, हे ६५ मिनिटे रंगलेल्या लढतीत दाखवले. सुपर सीरिजच्या तुलनेत ग्रां.प्रि. स्पर्धेचा दर्जा खालचा आहे; पण प्रणॉयचा खेळ अव्वल दर्जाचाच होता. कश्‍यप आणि प्रणॉय यांच्यात अनेक सरावाच्या लढती झाल्या असल्या, तरी आंतरराष्ट्रीय स्पर्धातील ही तिसरीच लढत होती. 

यापूर्वीची लढत तीन वर्षांपूर्वी झाली होती. त्यात प्रणॉयने दोन गेममध्येच बाजी मारली होती. त्याचबरोबर दोघांच्या जागतिक क्रमवारीतही खूपच अंतर आहे. प्रणॉय २३ वा आहे; तर कश्‍यप ५९ वा. कश्‍यपची खरी ताकद प्रणॉय जाणून होता. 

कश्‍यपने ७-१ अशी झटपट सुरवात केली खरी; पण रॅली लांबण्यास सुरवात झाल्यावर प्रणॉयची हुकमत दिसू लागली. १२-१२ बरोबरीनंतर पहिल्या गेममध्ये प्रणॉयने तीनच गुण गमावले. दुसऱ्या गेममध्ये कश्‍यपने जोरदार प्रतिकार करीत १४-९ आघाडी घेतली; पण प्रणॉयने १५-१५ बरोबरी साधली. कश्‍यपने हा गेम जिंकण्यासाठी सर्वस्व पणास लावले; पण त्यामुळे प्रणॉयसाठी तिसरा गेम सोपा झाला. त्याने ३-०, ७-३, ११-७ अशी आघाडी वाढवत विजय निश्‍चित केला. 

यश प्रणॉयचे
प्रणॉयचे तिसरे ग्रां.प्रि. गोल्ड विजेतेपद
यापूर्वी २०१४ मध्ये इंडोनेशियन मास्टर्स; तर गतवर्षी स्विस ओपन
इंडोनेशियन ओपनची उपांत्य फेरी ही त्याची यंदाची यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी होती

Web Title: sports h. s. prannoy win american open badminton competition