खेळाडूंच्या कामगिरीने देशाची मान उंचावली

वृत्तसंस्था
सोमवार, 26 डिसेंबर 2016

ते म्हणाले, "एक भारतीय म्हणून आम्ही तुमच्या कामगिरीने रोमांचित झालो आहोत. क्रिकेटमध्ये इंग्लंडवर मिळविलेला 4-0 विजय हा भारताची या खेळातील ताकद दाखवणारा होता...

नवी दिल्ली : देशातील नागरिकांशी "मन की बात' या कार्यक्रमांद्वारे संवाद साधणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशातील क्रीडापटूंचा गौरव करून तमाम क्रीडाशौकिनांची "मन की बात' समोर आणली. या कार्यक्रमात त्यांनी क्रिकेटपटू आणि हॉकीपटूंच्या कामगिरीचे कौतुक करताना तुमच्या विशेष कामगिरीने देशाची मान उंचावली, असे सांगितले. 

आपल्या "मन की बात'च्या नव्या अध्यायात त्यांनी भारतीय क्रिकेट आणि कुमार हॉकी संघाचे कौतुक केले. ते म्हणाले, "एक भारतीय म्हणून आम्ही तुमच्या कामगिरीने रोमांचित झालो आहोत. क्रिकेटमध्ये इंग्लंडवर मिळविलेला 4-0 विजय हा भारताची या खेळातील ताकद दाखवणारा होता. संघातील कुमार खेळाडूंची कामगिरी लक्षणीय होती. करुण नायर याचे त्रिशतक, लोकेश राहुलची फलंदाजी, कर्णधार विराट कोहलीचे सातत्य आणि त्याचे नेतृत्व सगळेच उजवे होते. अश्‍विनची कामगिरी नजरेत भरणारी होती. आयसीसीचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरल्याबद्दल त्याचे अभिनंदन.'' 
मोदी यांनी या वेळी कुमार हॉकीपटूंचे देखील तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, ""कुमार हॉकीत या बहाद्दरांनी तब्बल 15 वर्षांनी शुभ वार्ता दिली. हे विजेतेपद केवळ आनंददायी नाही, तर देशातील हॉकीला पाठबळ देणारे ठरणार आहे. पंधरा वर्षांनी तुम्ही जगज्जेतेपदाला गवसणी घातली. तुमचे अभिनंदन!'' 

भारताचे क्रीडा क्षेत्रातील हॉकीमधील भविष्य सुरक्षित हाती आहे, असा विश्‍वास देणारीच ही कामगिरी असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, ""केवळ मुलेच नाही, तर मुलींनी देखील भरीव कामगिरी केली आहे. त्यांनी आशियाई चॅंपियन्स करंडक पटकावले. 18 वर्षांखालील मुली आशिया करंडक स्पर्धेत ब्रॉंझपदकाच्या मानकरी ठरल्या. भविष्याच्या दृष्टीने या दोन्ही घटना सुखावणाऱ्याच आहेत. भारतीय हॉकीला आता चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यासारख्या कुमार खेळाडूंनीच आता ही जबाबदारी उचलायची आहे. मी सदैव तुमच्या पाठीशी असेन. तुमच अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा !'' 

Web Title: sports in mann ki baat