स्मिथने राजस्थानचे कर्णधारपद सोडले

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 मार्च 2018

मुंबई - चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात दोषी धरण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने अखेर राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी अजिंक्‍य रहाणेची अपेक्षित निवड करण्यात आली आहे. 

मुंबई - चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात दोषी धरण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने अखेर राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी अजिंक्‍य रहाणेची अपेक्षित निवड करण्यात आली आहे. 

चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणाची क्रिकेट ऑस्ट्रेलियानेदेखील गंभीर दखल घेतली असल्यामुळे हा निर्णय अपेक्षितच होता. चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणी थेट कबुली दिल्यामुळे आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सही स्मिथला कर्णधारपदावरून दूर करणार, हे निश्‍चित होते. पण, त्यापूर्वीच स्मिथने कर्णधारपद सोडत असल्याचे स्पष्ट केले. आयपीएलमध्ये राजस्थान संघासाठी कुठलीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून स्मिथने हा निर्णय घेतल्याचे संघाचे क्रिकेट प्रमुख झुबिन भरुचा यांनी म्हटले आहे. व्यवस्थापनाला पाठवलेल्या पत्रात स्मिथने पदाधिकारी, बीसीसीआय, भारतातील चाहत्यांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारही व्यक्त केले असल्याचे भरुचा यांनी सांगितले. संघाचे मेंटॉर असलेले शेन वॉर्न सध्या केप टाउन येथेच असल्यामुळे त्यांचीदेखील या संदर्भात स्मिथशी चर्चा झाली असेल, असे सांगून भरुचा यांनी यापुढील घडामोडींकडे आम्ही लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. 

वॉर्नरबाबत ‘वेट अँड वॉच’
स्मिथनेच कर्णधारपद सोडल्याने राजस्थानसमोरील पेच कमी झाला आहे. मात्र, डेव्हिड वॉर्नरबाबत हैदराबाद फ्रॅंचाईजीपुढील पेच कायम राहिला आहे. वॉर्नरबाबत अजून काहीच स्पष्ट झालेले नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला उपकर्णधारपदावरून हटवले आहे. त्यामुळे त्याच्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुढे जाऊन काय भूमिका घेते, याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे सध्या आम्ही ‘वेट अँड वॉच’ हेच धोरण ठेवले असल्याचे सनरायझर्स हैदराबाद फ्रॅंचाईजीचे मेंटॉर व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी सांगितले.

Web Title: sports news Australia Steve Smith Rajasthan Royals Ajinkya Rahane