"नंबर वन' होण्यापेक्षा राष्ट्रकुल सुवर्ण महत्त्वाचे - श्रीकांत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

मुंबई - भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तंदुरुस्त झाला आहे. माझ्यासाठी या स्पर्धेतले सुवर्णपदक महत्त्वाचे आहे. त्यासाठी तंदुरुस्त होण्याकरिता मी गेल्या वर्षी काही स्पर्धांतून माघार घेतली होती. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानापेक्षा माझ्यासाठी राष्ट्रकुल सुवर्णपदक महत्त्वाचे आहे, असे मत त्याने व्यक्त केले. 

मुंबई - भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तंदुरुस्त झाला आहे. माझ्यासाठी या स्पर्धेतले सुवर्णपदक महत्त्वाचे आहे. त्यासाठी तंदुरुस्त होण्याकरिता मी गेल्या वर्षी काही स्पर्धांतून माघार घेतली होती. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानापेक्षा माझ्यासाठी राष्ट्रकुल सुवर्णपदक महत्त्वाचे आहे, असे मत त्याने व्यक्त केले. 

राष्ट्रकुल तसेच आशियाई स्पर्धेतले सुवर्णपदक अधिक प्रतिष्ठेचे असते, असे सांगून श्रीकांत म्हणतो, गतवर्षी मी हॉंगकॉंग आणि फ्रेंच ओपन स्पर्धांत खेळू शकलो असतो; पण पुढील महिन्यातील राष्ट्रकुल आणि ऑगस्टमधील आशियाई स्पर्धेसाठी तंदुरुस्त राहण्यावर मी भर दिला. श्रीकांत सध्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे. 

सध्या माझा फॉर्म पाहता मी चायना किंवा हॉंगकॉंग स्पर्धांची किमान उपांत्यपूर्व फेरी गाठली असती आणि त्यामुळे मिळू शकणाऱ्या गुणांच्या जोरावर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आलोही असतो; परंतु मानांकनासाठी गुण मिळवण्यापेक्षा स्पर्धा जिंकणे महत्त्वाचे असते. त्यामुळे या स्पर्धांतून माघार घेतली होती, असे श्रीकांतने सांगितले. 

जागतिक बॅडमिंटनमध्ये काही वर्षांपूर्वी चिनी खेळाडूंचे वर्चस्व होते, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. अव्वल खेळाडूंमध्ये फारसा फरक नसतो. 2008 च्या बीजिंग आणि 2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये चीनने बॅडमिंटनची पाचही सुवर्णपदके (पुरुष एकेरी, दुहेरी, महिला एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी) मिळवली होती. आता इतर देशांचेही खेळाडू तेवढ्याच ताकदीने पुढे आले आहेत, असे सांगून श्रीकांतने सांगितली की, पुरुषांमध्ये विक्‍टर अक्‍सेलसेन हा अव्वल क्रमांकाचा खेळाडू डेन्मार्कचा आहे. ली चोंग वेई हा मलेशियाचा, मी भारताचा आहे, तर चीनचा चेन लॉंग हा चौथ्या क्रमांकावर असलेला खेळाडू आहे. 

सध्या युरोपातील खेळाडू जागतिक बॅडमिंटनमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. आपल्या देशाचेही खेळाडू अशीच प्रगती करत आहेत. पहिल्या 20 अव्वल खेळाडूंमध्ये पाच भारतीय आहेत, अशी माहिती श्रीकांतने दिली. 

श्रीकांतने गतवर्षी चार सुपर सीरिजचे विजेतेपद मिळवले होते. आता त्याला ऑल इंग्लंड आणि ऑलिंपिक पदकाची प्रतीक्षा आहे. या दोन स्पर्धांतील पदके आपल्या लिजेंटचा दर्जा मिळवून देते, असेही तो म्हणाला. 

गोपीसरांकडून सदैव प्रेरणा 
ऑल इंग्लंडचे माजी विजेते गोपीचंद यांच्याकडून ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रेरणा मिळते का? या प्रश्‍नावर श्रीकांत म्हणतो, केवळ ऑल इंग्लंडच नव्हे तर माझ्या प्रत्येक विजयाचे श्रेय गोपीचंदसरांना आहे. ऑल इंग्लंड जिंकायची असेल, तर ते कोर्टवर माझ्यासोबत असायला हवे. 

Web Title: sports news Badminton player Kidambi Srikkanth