महाराष्ट्राच्या मुलांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

मुकुंद धस - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

हैदराबाद - महाराष्ट्राच्या मुलांनी जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन करत रविवारी छत्तीसगड संघाचा ५४-५३ असा एका गुणाने पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अर्थात, छत्तीसगडने वाढत्या वयाचे खेळाडू खेळविल्यामुळे ही लढत वादग्रस्त ठरली.

हैदराबाद - महाराष्ट्राच्या मुलांनी जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन करत रविवारी छत्तीसगड संघाचा ५४-५३ असा एका गुणाने पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अर्थात, छत्तीसगडने वाढत्या वयाचे खेळाडू खेळविल्यामुळे ही लढत वादग्रस्त ठरली.

गच्चीबौली क्रीडा संकुलातील बंदिस्त हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत बास्केटबॉल महासंघाची मनाई असूनही छत्तीसगडने त्यांचे वादात अडकलेले चार खेळाडू खेळविले. ही गोष्ट पंचाच्या निदर्शनास आली, तेव्हा सामन्यातील तीन सत्र पार पडली होती. छत्तीसगड त्या वेळी ४१-३६ असे आघाडीवर होते. पंचांनी या खेळाडूंबाबत आक्षेप घेतल्यानंतर त्यांचे प्रशिक्षक आणि तांत्रिक समितीचे अध्यक्ष नॉर्मन आयझॅक यांच्यात वाद झाला. परिणामी २५ मिनिटे सामना थांबला होता. तांत्रिक समितीने त्या चारही खेळाडूंना वगळूनच पुढे सामना सुरू केला. अखेरच्या चौथ्या सत्रात  चुरस वाढली होती. सामना संपण्यास ३३ सेकंद बाकी असताना छत्तीसगडकडे ५३-५२ अशी आघाडी होती. त्या वेळा महाराष्ट्राच्या तनयला मिळालेल्या दोन फ्री थ्रोवर गुण नोंदवण्यात अपयश आले. सामना संपण्यास दोन सेकंद असताना पुन्हा एकदा आक्रमणावर असणाऱ्या तनयला चुकीच्या पद्धतीने रोखल्यामुळे महाराष्ट्राला पुन्हा दोन फ्रि थ्रो मिळाले. या वेळी मात्र तनयने कुठलीही चूक न करता दोन्ही थ्रो साधले आणि महाराष्ट्राला एका गुणाने विजय मिळवून दिला. महाराष्ट्राकडून तनयने २५, तर ओम पवारने १४ गुण नोंदवले. महाराष्ट्राच्या मुलींसाठी आजचा दिवस विश्रांतीचा होता. 

‘त्या’ ३२ खेळाडूंना परवानगी
स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय बास्केटबॉल महासंघाने विविध संघांतील ३२ खेळाडूंची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले होते. वैद्यकीय अहवालानंतर या सर्व खेळाडूंना वयोमर्यादेत बसत असल्याचे प्रमाणपत्र तांत्रिक समितीने दिले. त्यामुळे आजपासून हे खेळाडू स्पर्धेत खेळण्यास पात्र ठरले.

अन्य निकाल मुली - कर्नाटक वि.वि. छत्तीसगड ५७-४४, तमिळनाडू वि.वि. पंजाब ६०-२७ 

Web Title: sports news basketball