सेतुरामन यानेही दवडली विजयाची नामी संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

टिब्लिसी (जॉर्जिया) - विश्‍वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीच्या दुसऱ्या डावात एस. पी. सेतुरामन याने विजयाची सुवर्णसंधी दवडली. अनिष गिरीविरुद्ध त्याला बरोबरी स्विकारावी लागली.दुसरीकडे पहिल्या डावात संधी दवडलेल्या विदित गुजराथी याचीही डींग लिरनेशी बरोबरी झाली. त्यामुळे आता सोमवारी टायब्रेक डाव होतील.

सेतू (२६१७) व गिरी (२७७७) यांच्यातील तिसऱ्या फेरीचा दुसरा डाव लक्षवेधी ठरला. सिसिलियन नॅज्डॉर्फ विविधतेत सेतूने सहाव्या चालीस उंट ‘इ २’ चाल केली. त्यामुळे डाव ऑपोसेन्स्की विविधतेत रूपांतरित झाला. त्याच्या रणनीतीची तेव्हा उत्सुकता निर्माण झाली होती. २३व्या चालीस गिरीने प्याद्याची ‘इ ४’ चाल करणे गरजेचे होते, पण त्याने ‘एफ ४’ घरातील प्याद्याने सेतूचे ‘इ ३’ घरातील प्यादे टिपले. त्या वेळी सेतूला विजयाची संधी होती, पण ३९व्या चालीस त्याने वजीर ‘डी ८’ किंवा राजा ‘एच १’ चालीऐवजी हत्ती ‘एफ २’ ही चाल केली. तीच घोडचूक ठरली. गिरीने याचा फायदा घेण्यासाठी हत्तीने ‘एफ ३’ घरातील उंट मारायला हवा होता. पण त्याने हत्ती ‘इ १’ ही चाल केली. त्यामुळे त्याची सुद्धा ही घोडचूक ठरली. यामुळे एकुण पटस्थिती पाहता सेतूच्या विजयाची औपचारीकता बाकी होती, पण पुढील चालीत गिरीने भक्कम बचावात्मक खेळ केला. ७८ चालीनंतर रंगतदार डाव बरोबरीत सुटला. मात्र बरोबरीच्या डावातही बुद्धिबळ खेळाचे सौंदर्य दिसते याची प्रचिती रसिकांना आली.

विदीत (२७०२) व लिरेन (२७७१) यांच्यातील निम्झो भारतीय बचाव पद्धतीचा डाव ३७ चालींत बरोबरीत सुटला. दरम्यान, बू झियांगझी (२७१४) व विश्‍वविजेता मॅग्नस कार्लसन (२८२७) यांच्यात बरोबरी झाली. त्यामुळे पहिला डाव हरलेल्या कार्लसनचे आव्हान संपुष्टात आले.

Web Title: sports news chess competition