दुहेरी विक्रमासह मीराबाईचे सुवर्ण 

Mirabai-and-Gururaja
Mirabai-and-Gururaja

ग्लासगो ते  गोल्ड कोस्ट
मीराबाई २०१४ ग्लासगो स्पर्धेत रौप्यपदक विजेती ठरली होती. त्यानंतर रिओ २०१६ ऑलिंपिक स्पर्धेत ती वजनही उचलू शकली नव्हती. अपयशी चेहऱ्याने ती भारतात परतली. पण, मरगळ झटकून तिने सरावाला सुरवात केली. इतका सराव केला, की गेल्यावर्षी तिने जागतिक स्पर्धेत १९४ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले आणि आता राष्ट्रकुल स्पर्धेत आपलाच वैयक्तिक विक्रम मोडून तिने सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे स्नॅच आणि क्‍लीन-जर्क या दोन्ही प्रकारांत तिने आपल्या प्रत्येक प्रयत्नात सरस कामगिरी केली. एकदाही ती अपयशी ठरली नाही.

गोल्ड कोस्ट, (ऑस्ट्रेलिया) - जागतिक विजेतेपदाला साजेशी कामगिरी करताना भारताच्या मीराबाई चानू हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंग प्रकारात ४८ किलो वजनी गटात दुहेरी विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. पहिल्या दिवशी भारताला दोन पदके मिळाली. दुसरे पदकही वेटलिफ्टिंगमध्येच गुरुराजाने मिळवून दिले. तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला.

मीराबाई चानूची आजची कामगिरी विलक्षण होती. तिने सुवर्णपदकाला गवसणी घालताना सहा मिनिटांत सहा वेळा वजन उचलताना सहा विक्रम केले. स्नॅच प्रकारात तिने ८० किलो वजन उचलून विक्रमी सुरवात केली.

त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तिने ८४, तर तिसऱ्या प्रयत्नात ८६ किलो वजन उचलले. त्यानंतर क्‍लीन अँड जर्क प्रकारात आपल्या वजनापेक्षा डबल वजनाचा भार तीन प्रयत्नांत उचलला. तिने प्रथम १०३, नंतर १०७ आणि शेवटी ११० किलो वजन उचलले. तिने एकूण १९६ किलो वजन उचलताना स्पर्धा तसेच राष्ट्रकुल विक्रमाची नोंद केली. 

भारतीय संघासाठी फिजिओची नियुक्ती नसली, तरी मीराबाईने ही सुवर्ण कामगिरी केली. ती म्हणाली, ‘‘येथे आले तेव्हा विक्रम मोडायचा हे ठरवले होते; पण तशा कामगिरीची अपेक्षा बाळगली नव्हती. त्यामुळे आता यशाचे वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत.’’

मीराबाईने येथे फारशी स्पर्धाही नव्हती असे मान्य करून आपले लक्ष्य आता आशियाई स्पर्धेतील पदकाचे असल्याचे सांगितले. ती म्हणाली, ‘‘येथे फारशी स्पर्धा नव्हती; पण शेवटी कामगिरी करणे महत्त्वाचे असते. आता माझे लक्ष्य आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकाचे आहे. तेथे चीन आणि थायलंडसारखे तुल्यबळ प्रतिस्पर्धी असतात.’’

दरम्यान, पुरुषांच्या ५६ किलो वजनी गटात भारताच्या गुरुराजाने (स्नॅच १११ आणि क्‍लीन-जर्क १३८ किलो) असे २४९ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळविले. विशेष म्हणजे त्याची ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली. यातही क्‍लीन-जर्क प्रकारात त्याचे पहिले दोन प्रयत्न १३८ किलो वजनालाच अपयशी ठरले होते. तिसऱ्या प्रयत्नात मात्र त्याने वजन उचलून आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

क्‍लीन अँड जर्क प्रकारात पहिले दोन प्रयत्न फोल ठरल्यावर प्रशिक्षकांनी मला ही कामगिरी तुझ्यासाठी किती महत्त्वाची आहे याची जाणीव करून दिली. तिसऱ्या प्रयत्नात कुटुंबीय आणि देशाची आठवण केली व झोकून दिले. मला या कामगिरीचा अभिमान वाटतो.
- गुरुराजा,  भारताचा वेटलिफ्टिंग खेळाडू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com