आता लक्ष्य मालिका विजयाचे

पीटीआय
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

कोलंबो - गॉल येथील पहिला सामना चार दिवसांत दिमाखात जिंकणारा विराट कोहलीचा भारतीय संघ उद्या गुरुवारपासून सुरू होणारा दुसरा सामनाही जिंकून मालिका विजयाचे लक्ष्य बाळगून आहे, परंतु या सामन्यास सामोरे जाताना भारतीय संघ व्यवस्थापनाला शिखर धवनसह सलामीला कोणाला खेळवायचे हा प्रश्‍न सोडवावा लागेल.

कोलंबो - गॉल येथील पहिला सामना चार दिवसांत दिमाखात जिंकणारा विराट कोहलीचा भारतीय संघ उद्या गुरुवारपासून सुरू होणारा दुसरा सामनाही जिंकून मालिका विजयाचे लक्ष्य बाळगून आहे, परंतु या सामन्यास सामोरे जाताना भारतीय संघ व्यवस्थापनाला शिखर धवनसह सलामीला कोणाला खेळवायचे हा प्रश्‍न सोडवावा लागेल.

दोन वर्षांपूर्वी गॉल येथे भारताला पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर पुढील दोन सामन्यांसह मालिका जिंकून विराट कोहलीचा विजयी रथ सुरू झाला होता. आता गॉल येथूनच विजयी मोहीम सुरू केल्यामुळे आत्मविश्‍वास कमालीचा उंचावलेला आहे. संघ निवडीचा उभा राहणारा प्रश्‍नही संघाची क्षमता दर्शवणारा आहे. के. एल. राहुल तंदुरुस्त झाला आहे. त्याच्याऐवजी पहिल्या कसोटीत संधी देण्यात आलेल्या अभिनव मुकुंदने दुसऱ्या डावात ८१ धावांची खेळी केली होती. अर्थात, कर्णधार कोहलीने राहुल खेळणार असे स्पष्ट केले आहे. मात्र, कुणाला वगळणार हे निश्‍चित नाही. अभिनव मुकुंदला वगळले जाईल, अशी चर्चा मात्र आहे.

मुळात मुरली विजय दौऱ्यावर जाण्याअगोदर अनफिट ठरल्यामुळे त्याच्याऐवजी पुनरागमनाची संधी देण्यात आलेल्या शिखर धवनने पहिल्या डावात १९० धावांची खेळी केली. त्यालाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले होते.   

गॉल येथील सामन्यात फलंदाजी असो गोलंदाजी भारतीयांनी श्रीलंकेला प्रतिकार करण्याचीही संधी दिली नव्हती. चेतेश्‍वर पुजारापासून हार्दिक पंड्यापर्यंत सर्वच फलंदाजांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेतले होते. गॉल येथील सामना अश्‍विनचा ५० वा कसोटी सामना होता. आता सिंहली स्पोर्टस क्‍लबवर उद्यापासून सुरू होणारा सामना पुजाराचा अर्धशतकी सामना आहे. 

चंदिमलचे पुनरागमन
श्रीलंकेसाठी समाधानाची बाब म्हणजे कर्णधार दिनेश चंदिमलची उपलब्धता. पहिल्या सामन्यात तो आजारपणामुळे खेळू शकला नव्हता. याच चंदिमलने २०१५ मध्ये गॉल येथील सामन्यात १६९ चेंडूंत १६२ धावांची खेळी केली होती. त्या वेळी श्रीलंकेने मिळवलेल्या विजयात त्याची ही खेळी निर्णायक ठरली होती.

पंड्या की कुलदीप?
हार्दिक पंड्या टीम इंडियाचा बेन स्टोक्‍स होऊ शकतो, अशा शब्दात कोहलीने त्याचा गौरव केला होता. त्यामुळे त्याचे स्थान निश्‍चित असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे, परंतु सिंहली मैदानावरची खेळपट्टी कोरडी वाटत आहे, सहाजिकच फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व अपेक्षित आहे, अशा परिस्थितीत पंड्याऐवजी कुलदीप यादवचा विचार होईल.

Web Title: sports news cricket india srilanka