भक्कम भागीदारीचे भारताचे लक्ष्य

पीटीआय
बुधवार, 5 जुलै 2017

डर्बी - सलग तीन विजयांनी आत्मविश्‍वास उंचावलेला भारतीय महिला क्रिकेट संघ सलामीच्या तीनही लढती गमावलेल्या श्रीलंकेविरुद्ध यशोमालिका कायम राखण्यासाठी सज्ज आहे. या सामन्याद्वारे भक्कम भागीदारी रचण्यास सुरुवात करण्याचा भारतीय संघाचा इरादा आहे.

डर्बी - सलग तीन विजयांनी आत्मविश्‍वास उंचावलेला भारतीय महिला क्रिकेट संघ सलामीच्या तीनही लढती गमावलेल्या श्रीलंकेविरुद्ध यशोमालिका कायम राखण्यासाठी सज्ज आहे. या सामन्याद्वारे भक्कम भागीदारी रचण्यास सुरुवात करण्याचा भारतीय संघाचा इरादा आहे.

पहिल्या तिन्ही सामन्यांत विजय मिळवलेले असल्यामुळे उपांत्य फेरीसाठी भारताला अजून दोन सामन्यांत विजय आवश्‍यक आहे. दुसऱ्या बाजूला तीन पराभूत झाल्यामुळे श्रीलंकेचे आव्हान जवळपास संपुष्टात आलेले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताने श्रीलंकेवर नेहमीच वर्चस्व राखलेले आहे. दोन देशांत झालेल्या २४ पैकी २३ सामने भारताने जिंकलेले आहेत. २०१३ च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेने १३८ धावांनी भारताला नमवले होते.

फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही भारताकडून भक्कम कामगिरी होत आहे. माजी विश्‍वविजेते इंग्लंड आणि ट्‌वेन्टी-२० विश्‍वकरंडक विजेते वेस्ट इंडीज यांना पराभूत करताना भारताची फलंदाजी बहरली होती; मात्र पाकिस्तानविरुद्ध प्रतिकूल परिस्थितीत फलंदाजांना कष्ट करावे लागले होते, तरीही दीडशेच्या पलीकडे उभारलेली धावसंख्या गोलंदाजांनी सहजपणे निर्णायक ठरवली. त्यामुळे फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही आत्मविश्‍वास वाढलेला आहे. पाकिस्तानविरुद्ध एकता बिश्‍तने मिळवलेल्या पाच विकेट इतर गोलंदाजांसाठीही स्फूर्ती देणारे ठरू शकतील.

फलंदाजीत स्मृती मानधना चांगलीच फॉर्मात आहे. पाकिस्तानविरुद्ध ती अपयशी ठरली असली, तरी तिने ६६ च्या सरासरीने १९८ धावा केल्या आहेत. श्रीलंकेला तिची अधिक भीती असेल. स्मृतीसह दीप्ती शर्मा, कर्मधार मिताली राज, हरमनप्रीत कौर, मोना मेश्राम आणि सुषमा वर्मा अशी भारताची फलंदाजी भक्कम आहे.

श्रीलंकेवर वर्चस्व मिळवण्याची भारताला संधी असली, तरी चमारी अटापट्टू भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आक्रमक दीडशतक करणाऱ्या चमारीने तीन सामन्यांत मिळून ७७.३३ च्या सरासरीने २३२ धावा केलेल्या आहेत. तिचा अपवाद वगळता इतर फलंदाज अपयशी ठरल्या आहेत.

Web Title: sports news cricket Women's World Cup Cricket