दीपाची पसंती आता प्रुदुनोवाऐवजी ‘हॅंडस्प्रिंग ५४०’

पीटीआय
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

दीपाला दोन व्हॉल्ट माहिती आहेत. तिसरा शिकवत आहे. ती तीनपैकी दोन करू शकेल; पण कोणते दोन हे सांगणे अवघड आहे. ‘हॅंडस्प्रिंग ५४०’ चा खूपच प्राथमिक सराव सुरू आहे. प्रुदुनोवा सोडणे अवघड आहे; पण अशक्‍य नाही. ‘हॅंडस्प्रिंग ५४०’ अचूक झाले, तर जास्त गुण मिळू शकतात. अर्थात प्रुदुनोवाला तोड नाही. आगामी पाच महिन्यांत काय होते, यावर सर्व काही अवलंबून आहे.
- बिश्‍वेश्‍वर नंदी, दीपाचे मार्गदर्शक.

नवी दिल्ली - दीपा कर्माकरच्या चमकदार कामगिरीमुळे रिओ ऑलिंपिकपासून प्रुदुनोवा हा जिम्नॅस्टिकमधील प्रकार लोकप्रिय झाला; पण आता तिने या धोकादायक प्रकाराऐवजी ‘हॅंडस्प्रिंग ५४०’ या प्रकारावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. 

एप्रिलमध्ये सराव करताना दीपाला दुखापत झाली. तिच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यामुळे तिला आशियाई स्पर्धेपाठोपाठ जागतिक स्पर्धेसही मुकावे लागणार आहे. तिने नव्या वर्षात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे. 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ‘हॅंडस्प्रिंग ५४०’ करणार आहे. हवेत ही फिरकी घेतली जाते. ‘हॅंडस्प्रिंग फ्रंट’ मधील हा सर्वांत कठीण व्हॉल्ट आहे; पण त्याचा काठिण्य स्तर हा प्रुदुनोवापेक्षा कमी आहे, असे दीपाने सांगितले. दीपाच्या नावाशी प्रुदुनोवा हा शब्द जोडला गेला आहे. याकडे लक्ष वेधल्यावर ती म्हणाली, आताच पायावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्याच्यावर जास्त ताण देण्याची इच्छा नाही. माझे लक्ष्य २०२० चे ऑलिंपिक आहे. या ‘हॅंडस्प्रिंग ५४०’ मध्ये अचूकता साधली, तर राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकू शकते. प्रुदुनोवा त्याबरोबर सुरूच राहील. दीपाचा अजून जिम्नॅस्टिकचा सराव सुरू झालेला नाही. सध्या पुनर्वसन प्रक्रियाच सुरू आहे. चार महिने सराव नाही हे तिला सलत आहे. 

Web Title: sports news Deepa Karmakar