श्रीकांतचा झटपट ‘सराव’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

सलामीची लढत अर्ध्या तासाच्या आतच संपवली

मुंबई - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील भारताचा तीन तपांचा पदकाचा दुष्काळ संपवण्याची प्रमुख जबाबदारी असलेल्या किदांबी श्रीकांतने स्पर्धेस जोरदार सुरवात केली. दोन सुपर सीरिज विजेत्या श्रीकांतने जागतिक स्पर्धेतील सलामीच्या लढतीत जणू सरावच करताना झटपट विजय मिळविला.

सलामीची लढत अर्ध्या तासाच्या आतच संपवली

मुंबई - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील भारताचा तीन तपांचा पदकाचा दुष्काळ संपवण्याची प्रमुख जबाबदारी असलेल्या किदांबी श्रीकांतने स्पर्धेस जोरदार सुरवात केली. दोन सुपर सीरिज विजेत्या श्रीकांतने जागतिक स्पर्धेतील सलामीच्या लढतीत जणू सरावच करताना झटपट विजय मिळविला.

ग्लासगो येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी पी. व्ही. सिंधू आणि साईना नेहवाल या भारतीय बॅडमिंटनच्या फुलराणींना विश्रांती होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष श्रीकांतकडेच होते. दोन सुपर सीरिज विजेत्या श्रीकांतने रशियाचा राष्ट्रीय विजेता सर्जी सिरांत याला २१-१३, २१-१२ असे सहज हरवत पहिल्या फेरीचा अडथळा लीलया पार केला. गेल्या काही महिन्यांत भारतीय क्रीडा रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या श्रीकांतने हा विजय मिळविताना फारसे प्रयास घेतले नाहीत, त्याचवेळी आपली चांगली पूर्वतयारीही प्रतिस्पर्ध्यांना दाखवून दिली. 

श्रीकांतचे नेटजवळून केलेले ड्रॉप्स, तसेच स्मॅश त्याची ताकद दाखवणारे होते. किंबहुना हाच दोघांमधील मोठा फरक अधोरेखित करीत होता. सिरांतने श्रीकांतविरुद्ध सुरवातीपासून बेसलाइनवरून खेळण्यास पसंती दिली. त्याची पसंती बचावास होती. हा पवित्रा कसा पूर्ण चुकीचा आहे, हाच धडा श्रीकांतने त्याला २८ मिनिटांत संपवलेल्या लढतीत दिला. त्याचवेळी आपली गणना जगातील सर्वोत्तम आक्रमक बॅडमिंटनपटूत का होते, हेही दाखवून दिले. 
पहिल्या गेममध्ये श्रीकांतने काहीसे वेगळे फटके खेळून पाहिले. तो काहीसा प्रयोगही करीत होता. प्रसंगी ऐनवेळी रॅकेटची दिशा बदलत फटके मारत होता. बॉस श्रीकांतला आपण रोखू शकत नाही, याची जाणीव त्याच्या प्रतिस्पर्ध्यास दुसऱ्या गेमच्या सुरवातीसच झाली आणि त्याच्याकडून चुका वाढत गेल्या आणि श्रीकांतने फारसा घाम न गाळता पहिली फेरी जिंकण्याचे काम पूर्ण केले. 

दरम्यान, मिश्र दुहेरीत प्राजक्ता सावंतने मलेशियाच्या योगेंद्र कृष्णन याच्या साथीत सलामीची लढत जिंकली. त्यांनी लू याओ आणि चिंग सिन यांचा २१-१५, १३-२१, २१-१८ असा पराभव केला. सुमीत रेड्डी-अश्‍विनी पोनप्पा या भारतीय जोडीस पहिल्या फेरीत बाय लाभला. 

तन्वी, समीरचाही विजय
पुरुष एकेरीत श्रीकांत पाठोपाठ समीर वर्माने पहिला अडथळा पार केला. त्याने स्पेनच्या पाब्लो अबिआनचा २१-८, १७-४ असा पराभव केला. पाब्लोने दुसऱ्या गेमला लढत सोडून दिली. महिला एकेरीत तन्वी लाड हिने इंग्लंडच्या चोल ब्रिच हिचे आव्हान ५६ मिनिटांत पहिली गेम गमाविल्यानंतर १७-२१, २१-१०, २१-१९ असे परतवून लावले. 

दुहेरीत संमिश्र यश
सात्विकराज रंकीरेड्डी आणि के मनीषाने मिश्र दुहेरीत विजयी सलामी देताना हाँगकाँगच्या चुन हेई तॅम आणि सु वॅन एनजी यांचा २४-२२, २१-१७ असा पराभव केला. 

पुरुष दुहेरीत मनु अत्री-बी. सुमीत रेड्डी यांना पराभवाचा सामना करावा लागला. कोरियाच्या चुंग युई सेऑक-किम डुकयाँग जोडीने त्यांचा २२-२०, २१-११ असा पराभव केला.

ऑस्ट्रेलिया स्पर्धेनंतर प्रथमच खेळत होतो, त्यातच ही जागतिक स्पर्धा आहे. त्यामुळे ही लढत महत्त्वाची होती. दोन गेममध्येच जिंकल्यामुळे आत्मविश्‍वास उंचावला आहे. एकावेळी एकाच लढतीचा विचार करणार. 
- किदांबी श्रीकांत

आजचे आव्हान पुरुष एकेरी
अजय जयराम वि. ल्युका व्रॅबर, साईप्रणीत वि. वेई नॅन
महिला एकेरी 
पीव्ही सिंधूची प्रतिस्पर्धी अद्याप अनिश्‍चित. अपेक्षित वेळ ५.३० नंतर
(कार्यक्रमाचे स्वरूप सोमवारच्या लढती संपल्यानंतरच निश्‍चित होईल)

Web Title: sports news global badminton competition