सिंधू, जयराम, साईप्रणीतची विजयी सलामी

सिंधू, जयराम, साईप्रणीतची विजयी सलामी

मुंबई - पी. व्ही. सिंधू तसेच बी. साईप्रणीत आणि अजय जयराम यांनी भारतीय बॅडमिंटनची ताकद दाखवत जागतिक स्पर्धेतील आपली मोहीम सुरू केली. सिंधूने तर आगामी खडतर लढती लक्षात घेत दीर्घ रॅलीजचा जास्त सराव करून घेतला; तर साईप्रणीतने अडखळत्या सुरवातीनंतर विजय मिळवला.

ग्लासगो येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सिंधूने किम ह्यो मिन हिला २१-१६, २१-१४ असे दोन गेममध्येच हरवले. बॅडमिंटनच्या भाषेत बोलायचे झाले तर रिओ ऑलिंपिक रौप्यपदक विजेतीचा विजय क्‍लिनिकल होता. तिने आपले पूर्ण लक्ष्य साध्य करीतच विजय मिळविला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बेसलाइनवरून खेळतानाही तिने रॅलीवरील नियंत्रण कधीही गमावले नाही. यापूर्वी तिच्या या फटक्‍यात कमी आत्मविश्वास जाणवत असे, पण या वेळी सिंधूचे विजयी शॉट्‌स तिचा उंचावलेला स्वतःवरील विश्वासच दाखवत होते. सिंधूने किमविरुद्धची यापूर्वीची लढत गमावली होती, पण तो इतिहास आपण कधीच विसरलो आहोत हेच तिने दाखवले. किमने पहिला गेम गमावल्यावर सिंधूला थकवण्यासाठी दीर्घ रॅलीजवर भर दिला. सिंधूने किमची चांगलीच दमछाक केली. तिने प्रतिस्पर्धीस चुका करण्यास भाग पाडले.

बी. साईप्रणितने वेई नॅन याला २१-१८, २१-१७ असे नमवले. प्रणीतने मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावताना यशस्वी प्रतिकार केला. जागतिक क्रमवारीत प्रणीत १९ वा आणि नॅन ४४ वा आहे. आता त्याची लढत इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका गिनतिंग याच्याविरुद्ध होईल. गिनतीग २०१४ युवा ऑलिंपिक ब्राँझ विजेता आहे.  रितूपर्णा दास नशीबवान ठरली. तिची प्रतिस्पर्धी ऐरी मिक्केला हिने पहिल्या गेममध्ये ०-२ पिछाडी असताना पाय दुखावल्याने लढत सोडून दिली.

एकेरीत विजयी सप्तपदी
मुंबईकर अजय जयरामने ल्युक व्रॅबर याला हरवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. अजयने ही लढत २१-१४, २१-१२ अशी जिंकली. त्याच्या या विजयामुळे भारताच्या सात खेळाडूंनी पहिल्या फेरीची लढत जिंकली. साईनाला पहिल्या फेरीत बाय असल्यामुळे एकेरीत भारताच्या आठही खेळाडूंनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पहिल्या दिवशी किदांबी श्रीकांत आणि समीर वर्मा, तन्वी लाडने विजयी सलामी दिली होती.

प्रणव-सिक्कीचाच दिलासा
मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डीने प्राजक्ता सावंत - योगेंद्रन क्रिष्णन या भारत - मलेशिया जोडीस २१-१२, २१-१९ असे पराभूत केले. सुमीत अश्‍विनीने १३ व्या मानांकित चीनच्या जोडीस झुंजवले, पण ते अखेर १७-२१, २१- १८, ५-२१ असे पराजित झाले; तर सात्विकराज - मनीषाला डेन्मार्कच्या जोडीविरुद्ध २०-२२, १८-२१ अशी हार पत्करावी लागली.

ली चोंग वेई गारद
द्वितीय मानांकित ली चोंग वेई याला पहिल्याच फेरीत फ्रान्सच्या ब्राईस लेवेरदेझ याच्याविरुद्ध १९-२१ २४-२२ १७-२१ अशी हार पत्करावी लागली. 

दीर्घ रॅलीज हेच या लढतीचे वैशिष्ट्य आहे. लांबवलेली लढत खडतर ठरू शकते याची पुरेपूर जाणीव आहे. मला झटपट विजयच हवा होता.
- पी. व्ही. सिंधू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com