कुमार हॉकी संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध हार

पीटीआय
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

मुंबई - मलेशियाविरुद्ध २२ गोलांचा धडाका केल्यानंतर भारतीय कुमार संघाने सुलतान ऑफ जोहोर कप कुमार हॉकी स्पर्धेत ताकदवान ऑस्ट्रेलियाविरुद्ध आघाडी घेतल्यावर हार पत्करली.

मुंबई - मलेशियाविरुद्ध २२ गोलांचा धडाका केल्यानंतर भारतीय कुमार संघाने सुलतान ऑफ जोहोर कप कुमार हॉकी स्पर्धेत ताकदवान ऑस्ट्रेलियाविरुद्ध आघाडी घेतल्यावर हार पत्करली.

जोहोर बाहरू येथील तामन दया हॉकी स्टेडियमवरील लढतीत भारतास ३-४ पराभवास सामोरे जावे लागले. जोएल रिंताला याने तिसऱ्या मिनिटास कागारूंचे खाते उघडले; पण भारतीयांनी जोरदार प्रतिकार सुरू केला. संजय आणि दिलप्रीतसिंगने प्रत्येकी एक गोल करत भारतास विश्रांतीस आघाडीवर नेले. तिसऱ्या सत्रापासून कांगारू आक्रमक झाले. कॉबी ग्रीनने ३६ व्या मिनिटास ऑस्ट्रेलियास बरोबरी साधून दिली. जोनाथन ब्रेथेरटॉन याने नऊ मिनिटांनी ऑस्ट्रेलियास आघाडीवर नेले; पण दोनच मिनिटांत दिलप्रीतने गोल केला. त्या वेळी भारतीय प्रतिकार सुरू झाला असेच वाटले. 

भारताचा गोलबरोबरीचा आनंद दोनच मिनिटे टिकला. नॅथन एफ्रमस याचा गोल अखेर निर्णायक ठरला. सामन्यातील ऑस्ट्रेलियाचे सुरवातीचे वर्चस्व मोडून काढताना भारताने चांगला प्रतिकार केला होता. भारताची प्रतिआक्रमणे कांगारूंना चांगलीच सलत होती. तिसऱ्या सत्रापासून ऑस्ट्रेलियाने चेंडूवर चांगली हुकूमत राखली. त्यांनी खेळाची गती आपल्याला हवी तशी बदलत भारतीयांसमोरील आव्हान खडतर केले. त्यातच पहिल्या सत्रातील गोलप्रमाणेच भारतीयांना तिसऱ्या सत्रातील गोलच्या वेळी पेनल्टी कॉर्नर रोखल्यावर चेंडूवर ताबा राखता आला नव्हता.

भारतीयांनी चौथ्या सत्रात आक्रमणाचा वेग वाढवला खरा; पण ऑस्ट्रेलियाचा बचाव चांगलाच भक्कम होता. भारतास आता अंतिम फेरीसाठी शनिवारी ब्रिटनला पराजित करावे लागेल. ब्रिटनने ऑस्ट्रेलियास हरवल्यामुळे भारतासमोरील आव्हान सोपे नाही.

Web Title: sports news hockey australia