आयसीसी आचारसंहितेचा फेरआढावा घेणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 मार्च 2018

जोहान्सबर्ग - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणाने क्रिकेट विश्‍व ढवळून निघाले. त्याहीपेक्षा आयसीसीने स्मिथवर लादलेल्या केवळ एका सामन्याच्या बंदीची खूप चर्चा झाली. या सर्व घटनांचे परिणाम समोर येऊ लागल्यावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळाडूंसाठी असलेल्या आचारसंहितेचा फेर आढावा घेण्याचे ठरवले आहे. 

जोहान्सबर्ग - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणाने क्रिकेट विश्‍व ढवळून निघाले. त्याहीपेक्षा आयसीसीने स्मिथवर लादलेल्या केवळ एका सामन्याच्या बंदीची खूप चर्चा झाली. या सर्व घटनांचे परिणाम समोर येऊ लागल्यावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळाडूंसाठी असलेल्या आचारसंहितेचा फेर आढावा घेण्याचे ठरवले आहे. 

‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन म्हणाले, ‘‘आम्ही खेळाडूंसाठी असलेल्या आचारसंहितेचा फेर आढावा घेणारच होतो. पण, केप टाऊनमध्ये जे काही घडले त्यानंतर आम्ही तातडीने फेरआढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आम्हाला सर्व क्रिकेट मंडळ पूर्ण सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे.’’

खेळ भावना आणि क्रिकेटमधील सभ्यतेला तडा जाऊ नये यासाठी आम्ही हे पाऊल उचलले असल्याचे सांगून रिचर्डसन म्हणाले, ‘‘आम्ही आता आचारसंहितेचा आढाव घेताना आयसीसी क्रिकेट समितीत मेरिलीबोन क्रिकेट क्‍लब पदाधिकारी, सामना अधिकारी यांच्यासह आजी माजी क्रिकेटपटूंना सामावून घेणार  आहोत.’’

आक्रमकतेची मर्यादा कधीही न ओलांडणाऱ्या ॲलन बोर्डर, अनिल कुंबळे, शॉन पोलॉक, कोर्टनी वॉल्श, रिची रिचर्डसन या खेळाडूंची नावे आपल्यासमोर असल्याचेही रिचर्डसन यांनी स्पष्ट केले. चेंडू कुरतडण्याप्रकरणी केवळ कर्णधार स्टीव स्मिथवर एकाच कसोटी सामन्याची बंदी लादल्यानंतर आयसीसीच्या भूमिकेविषयी तर्क वितर्क केले जात होते.

 रिचर्डसन म्हणाले, ‘‘सध्याच्या आचारसंहितेत अशा प्रकारच्या गुन्ह्यास एकाच कसोटी सामन्यांची बंदीचा पर्याय आहे. स्मिथवर आम्ही त्यानुसारच कारवाई केली. मात्र, आता यानंतर झालेल्या खुल्या चर्चेमुळे या शिक्षेविषयीदेखील आम्हाला फेरविचार करावा लागणार आहे.’’

रिचर्डसन म्हणाले
क्रिकेटची सभ्यता कायम राखायची हेच आमचे उद्दिष्ट
आयसीसीची नेमकी भूमिका स्पष्ट व्हायला हवी. यासाठीच आचारसंहितेची निर्मिती
शिस्तभंग करणाऱ्याविरुद्ध कारवाई करताना प्रत्येकाला समान न्याय
आचारसंहिता समितीत खेळाडूंचा समावेश केल्यास त्यांचीही भूमिका समजू शकेल
चेंडू कुरतडण्याप्रकरणी असलेल्या शिक्षेच्या प्रस्तावाबाबतही फेरविचार

Web Title: sports news ICC cricket