भारत-पाक एकाच गटात

भारत-पाक एकाच गटात

गोल्ड कोस्ट (ऑस्ट्रेलिया) - आंतरराष्ट्रीय स्तरावरील हॉकी स्पर्धेतील भारत, पाकिस्तान एकाच गटात येण्याची मालिका राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही कायम राहिली आहे. या वेळी नुसतेच एका गटात नाही, तर या दोन पारंपरिक संघांमध्येच सलामीची लढत होणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने मंगळवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हॉकी सामन्यांचा कार्यक्रम जाहीर केला. राष्ट्रकुल हॉकी स्पर्धा पुढील वर्षी ४ ते १५ एप्रिल दरम्यान ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट येथे होणार आहेत. 

भारतीय पुरुष संघाचा समावेश असलेला ‘ब’ गट सोपा असून, पाकिस्तानविरुद्ध सलामीलाच लढत असल्याने पुढील सामन्यासाठी असलेले दडपण कमी होणार आहे. ‘ब’ गटात पाकिस्तान, इंग्लंड, मलेशिया, वेल्स या संघांचाही समावेश आहे. ‘अ’ गटात यजमान आणि पाच वेळचे विजेते ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, कॅनडा, स्कॉटलंड या संघांचा समावेश आहे. 

भारतीय महिलांचा ‘अ’ गटात समावेश असून, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, वेल्स हे गटातील अन्य संघ आहेत. महिला विभात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्कॉटलंड, कॅनडा आणि घाना यांचा ‘ब’ गटात समावेश आहे.

भारतीय महिलांचा सलामीचा सामना ५ एप्रिलला वेल्स संघाशी होईल. त्यानंतर मलेशिया (६ एप्रिल), इंग्लंड (८ एप्रिल) आणि दक्षिण आफ्रिका (१० एप्रिल) असे भारताचे सामने होणार आहेत. 

पुरुष विभागात ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व अपेक्षित असून, त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत हॉकीचा समावेश झाल्यापासून गेल्या पाच स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. त्यांना या वेळी आशियाई विजेत्या भारतीयांचेच आव्हान असेल. गेल्या दोन स्पर्धेत भारत उपविजेते राहिले आहेत. महिला विभागातही ऑस्ट्रेलियालाच सर्वाधिक पसंती आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांचे त्यांना आव्हान असेल. 

दोन्ही गटातील पहिले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. अन्य संघ क्‍लासिफिकेशन सामने खेळतील. महिलांच्या उपांत्य लढती १२ एप्रिल, तर पुरुषांच्या उपांत्य लढती १३ एप्रिल रोजी होतील. ब्राँझ आणि सुवर्णपदकाच्या दोन्ही विभागातील लढत १४ एप्रिलला होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com