मुंबई उपनगर, कोल्हापूर विजयी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

मुंबई - किशोर गटाच्या २९ व्या राज्य अजिंक्‍यपद कबड्डी स्पर्धेत मुलांच्या व मुलींच्या गटातही कोल्हापूरने विजेतेपदाचा मान पटकावला. कोल्हापूरने या वेळी दोन्ही गटांतून अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यांना मुलींच्या गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

मुंबई - किशोर गटाच्या २९ व्या राज्य अजिंक्‍यपद कबड्डी स्पर्धेत मुलांच्या व मुलींच्या गटातही कोल्हापूरने विजेतेपदाचा मान पटकावला. कोल्हापूरने या वेळी दोन्ही गटांतून अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यांना मुलींच्या गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

अलिबाग येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुलींच्या गटातील सामन्यात मुंबई उपनगरने कोल्हापूरचे कडवे आव्हान २७-२३ असे परतवून लावले. कोल्हापूरने गतविजेत्या पुणे संघाला हरवून अंतिम फेरी गाठली होती. मुंबई उपनगरच्या मुलींनी पूर्वार्धात आक्रमक खेळ करताना १७-९ अशी मोठी आघाडी मिळवली होती. या मोठ्या आघाडीचा फायदा उठविण्यात त्यांना अपयश आले. संयमी खेळ करणाऱ्या कोल्हापूरच्या मुलींनी त्यांना उत्तरार्धात झुंजवले. अखेरच्या पाच मिनिटांपर्यंत मुंबई उपनगरने २२-१६ अशी आघाडी राखली होती. त्यानंतर कोल्हापूरच्या आक्रमक खेळाने दीड मिनीट बाकी असताना त्यांची आघाडी केवळ दोन गुणांवर आली. त्याच वेळी मैदानातील मुंबईच्या तीन मुलींनी कोल्हापूरच्या खेळाडूची ‘सुपर टॅकल’ करून पुन्हा आपली बाजू भक्कम केली. करिना कामतेकर, शुभदा खोत, शर्वरी गोडसे यांचा कल्पक खेळ मुंबईच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरला. कोल्हापूरच्या ऋतुजा कडलम, प्रांजल पवार, प्रतिक्षा पाटील यांचे प्रयत्न अपुरे पडले.

मुलांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरने परभणीचे आव्हान ३६-१९ असे संपुष्टात आणले. कोल्हापूरच्या मुलांनी सुरुवातीपासूनच टॉप गिअरमध्ये खेळ करताना विश्रांतीला १७-८ अशी आघाडी मिळवली. तेजस पाटीलच्या खोलवर चढाया आणि सौरभ इंगळे, अमोल चव्हाण यांनी केलेल्या पकडी कोल्हापूरच्या विजयात निर्णायक ठरल्या.

त्यापूर्वी उपांत्य फेरीत मुलींच्या गटात उपनगरने मुंबई शहरला ३८-३४, तर कोल्हापूरने पुण्याचा ४६-२६ असा पराभव केला होता. मुलांच्या गटात कोल्हापूरने ठाण्याचा ४५-३१, तर परभणीने उपनगरचा २७-२२ असा पराभव केला.

Web Title: sports news Kabaddi